पाट्या बदलणं परवडेल की दुकानाच्या काचा ..... ?

पाट्या बदलणं परवडेल की दुकानाच्या काचा ..... ? 

वेब टीम मुंबई : दुकानांवरील मराठी पाटय़ा लावताना शोधल्या जाणाऱ्या पळवाटा रोखत मराठी पाटय़ा सक्तीचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. दरम्यान महाराष्ट्रात दुकानांवरील मराठी पाटय़ांचे श्रेय इतर कोणी लाटू नये. ते श्रेय फक्त मनसेचे व मनसे कार्यकर्त्यांचे अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठी पाटय़ांवरून शिवसेना आणि मनसेत श्रेयवादाचे राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. दरम्यान दुसरीकडे व्यापारी मात्र या निर्णयाला विरोध करत आहेत. या व्यापाऱ्यांनाही शिवसेना आता मनसेकडून इशारा दिला जात आहे.

राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पत्र शेअर केलं आहे. “या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात यासाठी खरंतर आंदोलन करावं लागून नये, परंतु २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या,” असं राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.

“महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं दुकानावरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला तेव्हा त्याचं श्रेय फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांचं मन:पूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच,” असंही राज ठाकरेंनी सांगितलं आहे. राज ठाकरे यांनी यावेळी महाराष्ट्र सरकारचंही अभिनंदन केलं आहे. “महाराष्ट्र सरकारचंही अभिनंदन. सरकारला मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका. याची अंमलबजावणी नीट करा,” असा सल्ला राज ठाकरेंनी दिला आहे

“यात आणखी एक भानगड सरकारनं करुन ठेवली आहे की, मराठी भाषेशिवाय इतर भाषा नामफलकांवर चालतील म्हणून. याची काय गरज आहे? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लावू नका,” असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

व्यापाऱ्यांना मनसेचा इशारा

दरम्यान मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या निर्णयाला विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना इशारा दिला आहे. “ज्या व्यापारांचा मराठी पाटीला विरोध आहे त्यांना एकच प्रश्न आहे. पाटी बदलण्याचा खर्च जास्त आहे की दुकानाच्या काचा बदलण्याचा?,” असा सूचक इशाराच संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत दिला आहे.

Post a Comment

0 Comments