योगी आदित्यनाथां विरोधात देणार शिवसेना उमेदवार

योगी आदित्यनाथां विरोधात देणार शिवसेना उमेदवार

वेब टीम नवी दिल्ली : उत्तर प्रदेशची निवडणूक देशाची दिशा ठरवते असं म्हटलं जातं. त्यामुळेच आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अयोध्येतून निवडणूक लढवू शकतात या चर्चेला सध्या उधाण आलंय. त्यातच आता शिवसेनेने देखील दंड थोपटले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना अयोध्येत योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात उमेदवार देणार आहे अशी घोषणा केलीय. याशिवाय शिवसेना उत्तर प्रदेशमधील प्रचाराची सुरुवात मथुरेतून करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

संजय राऊत यांनी शिवसेना उत्तर प्रदेशमध्ये ५० ते १०० जागा लढवण्याबाबत चाचपणी करत असल्याचंही म्हटलं आहे. ते म्हणाले, “माझ्याकडे मथुरेतील काही प्रमुख लोक येऊन गेले. त्यांनी शिवसेनेच्या प्रचाराची सुरुवात मथुरेतून करावी अशी आग्रही मागणी केलीय. अयोध्येप्रमाणे मथुरेत देखील काही प्रश्न आहेत. पुढील २-३ दिवसात मी स्वतः मथुरेत जाणार आहे. तिथे कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे.

“आम्ही काँग्रेसकडे झोळी घेऊन उभे नाही. शिवसेना, राष्ट्रवादीने काँग्रेससमोर एक प्रस्ताव ठेवला. महाराष्ट्रात एकत्र आहोत, तर गोव्यात एकत्र लढू असं म्हटलं. मी यावर राहुल गांधी यांच्याशी देखील चर्चा केली. ते सकारात्मक आहेत, पण गोव्यातील स्थानिक नेतृत्वाच्या डोक्यात नेमकं काय आहे हे माहिती नाही,” असं राऊत यांनी म्हटलं.

“आम्ही त्यांना सांगितलं ४० पैकी ३० जागा तुम्ही लढा. त्या उरलेल्या १० जागा राष्ट्रवादी, शिवसेना आणि गोवा फॉरवर्ड या ३ मित्रपक्षांना द्या. आम्ही काँग्रेस जिथं कधीच जिंकली नाही त्या जागा मागितल्या. काँग्रेसच्या खिशातील जागा मागितल्या नाहीत. आज काँग्रेसकडे ३ आमदारही उरलेले नाहीत,” असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.

Post a Comment

0 Comments