“हा सगळा स्टंट असल्याचं दिसत आहे” राकेश टिकैत यांचा मोदींवर निशाणा!

“हा सगळा स्टंट असल्याचं दिसत आहे” राकेश टिकैत यांचा मोदींवर निशाणा!

वेब टीम चंदीगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी ‘सुरक्षेतील गंभीर त्रुटी’मुळे पंजाबचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले. पंतप्रधानांच्या सुरक्षेत पंजाब पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचे नमूद करत केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भातील अहवाल मागवला़ या घटनेवरून राजकीय वादंग निर्माण झाला असून, भाजपा आणि काँग्रेसने परस्परांवर टीकेचा भडिमार सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर आज भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया देताना, पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

“ केंद्र सरकार म्हणते की सुरक्षेत त्रुटी होती आणि पंजाब सरकार म्हणते की पंतप्रधान तिथे गेले नाहीत कारण त्यांच्या रॅलीतील खुर्च्या रिकाम्या होत्या. दोघेही केवळ स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधानांनी तिथे जायला नको होते.” असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.

तसेच,“ अशाप्रकारची जी बातमी सुरू आहे की पंतप्रधान वाचले, सुखरूप परतले वैगेरे यावरून असं वाटतं की हा पूर्णपणे एक स्टंट आहे. मीडिया देखील म्हणत आहे की तिथून सुखरूप आले. मग असं होतं तर ते तिथे गेलेच कशाला? हा पूर्णपणे एक जनतेची सहानुभूती मिळवण्याचा सोपा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला गेला आहे.” असा आरोपही राकेश टिकैत यांनी केला आहे. 

फिरोजपूर येथील सभेसाठी निघालेला पंतप्रधानांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी अडवला़ त्यामुळे मोदी हे भटिंडामधील पुलावर १५-२० मिनिटे अडकून पडले होते. अचानक झालेल्या घडामोडींनंतर मोदींचे पंजाबमधील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. पंजाब दौऱ्यात मोदींच्या हस्ते ४२ हजार ७५० कोटींच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार होता.

Post a Comment

0 Comments