जगभरात तीन अब्जापेक्षा जास्त लोकांना करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता : जागतिक आरोग्य संघटना

जगभरात  तीन अब्जापेक्षा जास्त लोकांना करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता : जागतिक आरोग्य संघटना 

वेब टीम वॉशिंग्टन : देशात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा करोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दुसरीकडे करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. ओमायक्रॉनच्या नवीन प्रकारांची प्रकरणे ज्या वेगाने वाढत आहेत, त्यामुळे एक नवीन समस्या उद्भवू शकते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. दरम्यान या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली आहे. तसेच तिसऱ्या लाटेत उच्चांकी रुग्णसंख्या किती असू शकते, याचे अंदाज तज्ज्ञांकडून बांधण्यात येत आहेत.

भारतात डेल्टा व्हेरिएंटमुळे करोनाची दुसरी लाट आली होती. दुसऱ्या लाटेत डेल्टामुळे जेवढे रुग्ण आढळले होते, तेवढीच रुग्णसंख्या ओमायक्रॉनमुळे वाढण्याची शक्यता आहे, असे इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशनचे संचालक आणि वॉशिंग्टन विद्यापीठातील आरोग्य मेट्रिक्स सायन्सेसचे अध्यक्ष डॉ क्रिस्टोफर मरे यांनी सांगितलंय. 

ते म्हणाले, की लसीकरणामुळे करोनाची लक्षणे सौम्य असली तरी, ओमायक्रॉन मोठ्या संख्येने लोकांना संक्रमित करेल आणि कोणतेही निर्बंध हे संक्रमण थांबवू शकत नाहीत. इंडिया टुडेला दिलेल्या एका खास मुलाखतीत, डॉ. क्रिस्टोफर मरे म्हणाले की, “ओमायक्रॉन प्रकारामुळे केवळ दोन महिन्यांच्या कालावधीत जगभरात तीन अब्जांपेक्षा जास्त लोकांना संसर्ग होऊ शकतो. या वाढीदरम्यान, भारतात डेल्टामुळे दुसऱ्या लाटेत जितके रुग्ण आढळले होते, तितकेच रुग्ण आढळतील,” असंही ते म्हणाले.

“जानेवारीच्या मध्यात ओमायक्रॉनमुळे रुग्णसंख्या पिकवर असेल. या काळात जगभरात एका दिवसात तब्बल ३५ कोटी रुग्णसंख्या नोंदवली जाण्याची शक्यता आहे. गेल्या एप्रिलमध्ये डेल्टामुळे आलेल्या दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक रुग्णसंख्येपेक्षा ही संख्या तिप्पट आहे. भारतात जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते,” असा इशारा त्यांनी दिला.

Post a Comment

0 Comments