सरकारी बँकांचा खासगीकरणाविरोधात देशव्यापी काम बंद आंदोलन

सरकारी बँकांचा खासगीकरणाविरोधात देशव्यापी काम बंद आंदोलन

वेब टीम मुंबई : केंद्र सरकार आगामी काळात सरकारी बँकांच्या खासगीकरणासाठी विधेयक सादर करणार असल्याचा आरोप करत या बँकांच्या संघटनांनी काम बंद आंदोलनाचा (Bank Strike) निर्णय घेतला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या आवाहानानुसार हा संप केला जात आहे. यानुसार आज, गुरुवार (१६ डिसेंबर) आणि शुक्रवार (१७ डिसेंबर) अशा २ दिवशी सर्व सरकारी बँक कर्मचारी संपावर असणार आहेत. याचा ग्राहकांच्या सेवेवर थेट परिणाम होणार आहे. याबाबत बँकांनी देखील आपल्या ग्राहकांना माहिती दिली आहे.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचे संयोजक महेश मिश्रा याबाबत निवेदन जारी करत माहिती दिलीय. या संपात सार्वजनिक क्षेत्रातील (सरकारी) ४,००० बँक शाखांमधील २५,००० अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत. केंद्र सरकार संसदेत बँकिंग कायद्यांमध्ये दुरुस्तीचं विधेयक सादर करणार आहे. यामुळे भविष्यात कोणत्याही सरकारी बँकेचे खासगीकरण करणं सोपं होणार आहे. सरकारचा खासगीकरणाचा मार्ग मोकळा होणार आहे.

चेक वटवणे आणि पैसे हस्तांतरण करणाऱ्यांनी सावधान

भारतीय स्टेट बँकेसह (SBI) इतर बँकांनी आपल्या ग्राहकांना या संपामुळे त्यांच्या सेवेवर परिणाम होऊ शकतो याची माहिती दिली आहे. या संपामुळे ग्राहकांच्या चेक वटवणे आणि पैसे हस्तांतरण करण्यात अडचणी येऊ शकतात. ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फडरेशनचे (AIBOC) सचिव सौम्य दत्ता म्हणाले, “अतिरिक्त मुख्य कामगार आयुक्तांसमोर झालेली बैठक निष्फळ ठरली. त्यामुळेच संघटनांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.”

दरम्यान, मोदी सरकारने याआधी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात २ सरकारी बँकांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मांडला होता. याच पार्श्वभूमीवर आता बँक युनियनने संपाचं हत्यार उगारलं आहे.


Post a Comment

0 Comments