देशात पुन्हा लॉकडाउन ची शक्यता ?

देशात पुन्हा लॉकडाउन ची शक्यता ?

वेब टीम नवी दिल्ली : ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. देशात आतापर्यंत २३६ हून अधिक ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली असून यामधील १०४ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या ओमायक्रॉनबाधितांची एकूण संख्या ८८ झाली आहे. यानंतर दिल्ली, तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान आणि केरळ या राज्यांचा क्रमांक आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लावण्याची तयारी सुरु झाली असताना केंद्राकडूनही कठोर निर्णयाची शक्यता आहे. भाजपा खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांनी ट्वीट करत तसे संकेत दिले आहेत.

ओमायक्रॉन: मोदी सरकार घेणार मोठा निर्णय? अजित पवारांनी दिले संकेत; म्हणाले, “स्वत: देशाचे पंतप्रधान…”करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूच्या वेगवान प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बैठक घेऊन करोनास्थितीचा आढावा घेतला. सर्व लसपात्र नागरिकांचे लवकरात लवकर संपूर्ण लसीकरण करून घ्यावे, अशी सूचना मोदींनी राज्यांना केली. आपण सतर्क आणि सावध राहायला हवे, असे नमूद करत मोदी यांनी करोनाप्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या.

“देशात लॉकडाउन जाहीर झाला तर आश्चर्य वाटू देऊ नका”

भाजपाचे खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांनी ट्वीट केलं असून लॉकडाउन जाहीर झाला तर आश्चर्यचकित होऊ नका असं म्हटलं आहे. तसंच उत्तर प्रदेश निवडणुकाही पुढे ढकलल्या जाऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली आहे.

“ओमायक्रॉनमुळे लॉकडाउन जाहीर झाल्यास आणि उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवटीखाली निवडणुका सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्यास आश्चर्य वाटू देऊ नका. यावर्षाच्या सुरुवातीला ज्या गोष्टी प्रत्यक्षपणे करु शकले नाहीत त्या पुढील वर्षी अप्रत्यक्षपणे केल्या जातील,” असं ते म्हणाले आहेत.

“देशात नाईट लॉकडाउन लावण्याचा विचार”

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत बोलताना केंद्र सरकार सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नाईट लॉकडाउन लावण्याचा विचार करत असल्याचं म्हटलंय. “स्वत: देशाचे पंतप्रधान देखील जे काय सध्या करोनाच्यासंदर्भातील संकट आहे त्याबद्दल गांभीर्याने विचार करतायत. त्यामध्ये रात्री लॉकडाउन करण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर, देश पातळीवर सुरु आहे,” असं अजित पवार म्हणाले.

राज्यात पुन्हा निर्बंध; रात्री जमावबंदी, नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमांवरही बंधने

महाराष्ट्रासह देशात करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचे सावट गडद झाले असून, राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. त्यानुसार आज, शुक्रवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात येणार असून, याबाबत आज नियमावली जाहीर करण्यात येईल. त्यानुसार, शुक्रवारपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येणार असून, धार्मिक स्थळे, सार्वजनिक ठिकाणांवरील गर्दी कमी करण्याबरोबरच नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमांवर बंदीची शक्यता आहे.

स्थानिक पातळीवर निर्बंध?

नाताळ आणि नववर्ष कार्यक्रमांवर ओमायक्रॉनचे सावट आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागल्याने स्थानिक पातळीवर निर्बंध लागू करण्याबाबत विचार करा, अशी सूचना केंद्र सरकारने गुरुवारी राज्यांना केली. मोठ्या प्रमाणात नवे रुग्ण आढळणारी ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करावीत आणि करोनाबाधितांचे प्रमाण, रुग्णदुपटीचा दर यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश केंद्राने दिले आहेत. तसेच निवडणुका तोंडावर आलेल्या राज्यांत लसीकरण मोहिमेला वेग देण्याची सूचना केंद्राने केली.

चर्चमध्ये ५० टक्के उपस्थितीची मर्यादा

करोनाच्या पार्श्वभूमीवर ख्रिस्ती बांधवांनी नाताळचा सण खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन करत राज्याच्या गृहविभागाने चर्चमध्ये क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेत उपस्थितीला परवानगी असेल, असे गुरुवारी स्पष्ट केले. नाताळच्या दिवशी चर्चमध्ये प्रभू येशूच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री आदी वस्तू ठेवल्या जातात. यावेळी अंतरनियमासह करोना नियमांचे पालन करावे, मिरवणूक काढू नये, गर्दीचे कार्यक्रम आयोजित करू नयेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments