शेतकऱ्यांची अवस्था इंग्रज काळापेक्षाही भयानक : पी. साईनाथ
वेब टीम सोलापूर : देशातील शेतकरी इंग्रजकाळात ज्याप्रमाणे दबला आणि पिचला गेला होता, त्यापेक्षा अधिक भयानक अवस्थेतून सध्या देशातील शेतकऱ्यांना जावे लागत आहे. सरकार कोणाचेही असो, संसदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक दिवसही चर्चा होत नाही. प्रसार माध्यमेही बड्या भांडवलदारांच्या खिशात गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे, असा सूचक इशारा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार पी. साईनाथ यांनी दिला आहे.
सोलापुरात एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी साईनाथ आले होते. त्यावेळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात त्यांनी शेतकरी, प्रसार माध्यमे आदी मुद्यांवर परखड शब्दांत भाष्य केले.
ते म्हणाले, भारत कृषिप्रधान देश असूनही येथील शेतकऱ्यांना न्यायासाठी सातत्याने झगाडावे लागते. कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली सीमेवर झालेले शेतकऱ्यांचे आंदोलन हे देशातील सर्वाधिक ताकदीचे आणि यशस्वी झालेले आंदोलन आहे. या आंदोलनाची इतिहासात नोंद होईल. कृषिउत्पन्न बाजार समित्या म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने काही स्वर्ग नाहीत. त्या तर सरकारच्या इशा-यावरच चालतात. शेतात प्रत्यक्ष राबणा-या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. शेतीमालाला योग्य हमीभाव मिळाल्यास देशातील अनेक समस्या सुटू शकतात. समाजाच्या चुकीच्या मानसिकतेमुळे शेतीत राबणा-या स्त्रियांच्या कष्टाचीही दखल घेतली जात नाही. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सरकारच्या विरोधात झगडण्याची मानसिकता शेतकऱ्यांना ठेवावी लागणार आहे, असे मत साईनाथ यांनी व्यक्त केले.
करोनाकाळात सर्वच क्षेत्रे बाधित होऊन आर्थिकदृष्ट्या नुकसानीत गेली. परंतु याच करोनाकाळात अंबानींच्या वैयक्तिक उत्पन्नात दुपटीने वाढ होते. हे कशाचे लक्षण आहे ? अंबानींनी अनेक माध्यम संस्था विकत घेऊन खिशात घातल्या आहेत. या माध्यम संस्था मालकांशीच इमानी राहणार आणि त्यांचीच री ओढणार, यात नवल नाही. परंतु अशा बड्या भांडवलदारांशी संबंध नसलेल्या माध्यम संस्थाही जाहिरातींच्या लालसेपोटी त्यांच्या विरोधात बोलायला तयार नाहीत, याकडेही साईनाथ यांनी लक्ष वेधले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मोकाशी, प्रा. विलास बेत, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदी उपस्थित होते.
0 Comments