महात्माजींच्या मारेकऱ्याचा जयघोष करणाऱ्याना फाशी द्या : भाजपा खा.वरूण गांधी

महात्माजींच्या मारेकऱ्याचा जयघोष करणाऱ्याना फाशी द्या : भाजपा खा.वरूण गांधी 

वेब  टीम पिलीभीत : भाजपा खासदार वरूण गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या पीलिभीतमध्ये बोलताना महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेविषयी परखड भूमिका मांडली आहे. यासोबतच, आपल्याच पक्षाच्या केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. वरूण गांधी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने केंद्रातील भाजपा सरकारवर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून टीका करत आहेत. निरनिराळ्या सरकारी संस्थांच्या खासगीकरणावरून देखील त्यांनी केंद्राला सुनावलं आहे. या मुद्द्यावरून भाजपातील वरीष्ठ नेत्यांचा रोष देखील त्यांना पत्करावा लागला आहे.

पीलिभीत या आपल्या मतदारसंघात वरूण गांधींनी सोमवारी अंगणवाडी सेविका आणि इतर महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “मी इथे काही मुख्यमंत्र्यांना किंवा पंतप्रधानांना निवेदन देण्यासाठी आलेलो नाही, मी देशाचं राजकारण करायला आलो आहे”, असं सांगत उत्तर प्रदेश सरकारच्या धोरणांवर देखील निशाणा साधला. वेतन, कामाबाबतच निश्चिती अशा काही मूलभूत मागण्यांसाठी या महिला कर्मचारी आंदोलन करत आहेत.

“आज माझ्यासमोर आख्खा देश बसला आहे. माझ्यासमोर ना कुणी हिंदू आहे ना कुणी मुसलमान, ना कुणी पुढारलेला आहे, ना कुणी मागास. असा भेद करून आपण हिंदुस्थानला कमकुवत करत आहोत. मी इथे तुमचा मुद्दा फक्त देशाच्या संसदेत मांडण्यासाठी आलेलो नाही. मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांना निवेदन देण्यासाठी देखील आलेलो नाही. तेही मी करीन, पण इथे मी आलोय ते तुम्हाला सांगायला की मी या आंदोलनामध्ये तुमच्या सोबत आहे”, असं वरूण गांधी यावेळी म्हणाले.

दरम्यान, यावेळी बोलताना वरुण गांधी यांनी महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचा जयघोष करणाऱ्यांना फाशी दिली पाहिजे, असं देखील म्हणाले. “महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी गोडसे जिंदाबाद बोलणाऱ्या लोकांना फाशी दिलं पाहिजे. आता जय हिंद म्हणण्याची वेळ आली आहे. भगवान राम मर्यादा पुरुषोत्तम होते. ज्यांनी लोकांना जोडण्याचं काम केलं. गांधीजींच्या जयंतीच्या दिवशी सोशल मीडियावर गोडसे जिंदाबाद ट्रेंड होत होता. आपल्याला एक हिंदुस्थान करायचा आहे. सरकार कुणाचं आहे, याची मला फिकीर नाही. मी तुमच्यासोबत आहे” असं वरूण गांधी यावेळी म्हणाले

सर्व आंदोलकांच्या मागण्या सरकार दरबारी मांडण्याचं आश्वासन यावेळी वरूण गांधी यांनी दिलं.

Post a Comment

0 Comments