आता रेल्वेतही असणार ‘ट्रेन होस्टेस’; ‘या’ गाड्यांमध्ये दिली जाणार सुविधा

आता रेल्वेतही असणार ‘ट्रेन होस्टेस’; ‘या’ गाड्यांमध्ये दिली जाणार सुविधा

वेब टीम नवी दिल्ली : तुम्ही कधी विमानातून प्रवास केला असेल तर तुम्हाला विमानातल्या अत्याधुनिक सेवा सुविधांबद्दल माहिती असेलच. पण ज्यांना विमान प्रवास परवडत नाही, अशांसाठी आता विमानासारख्या सेवासुविधा रेल्वेत पुरवण्यात येणार आहेत. भारतीय रेल्वे लवकरच विमानाच्या तोडीची होणार आहे. विमानाप्रमाणेच अनेक अत्याधुनिक सेवासुविधा रेल्वेतही पुरवण्यात येणार असल्याने सामान्य लोकांना त्याचा लाभ घेता येणार आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, भारतीय रेल्वे लवकरच प्रीमियम ट्रेन्समध्ये ट्रेन होस्टेस सुविधा पुरवणार आहे. सुरुवातीला ही सुविधा वंदे भारत एक्सप्रेस, गतिमान एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेससारख्या ट्रेनमध्ये पुरवली जाईल. राजधानी आणि दुरंतो एक्सप्रेस सारख्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये सध्या ही सुविधा उपलब्ध नसेल.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ट्रेन होस्टेस म्हणून केवळ महिलाच नव्हे तर पुरुषांची भरती देखील केली जाणार आहे. ट्रेन होस्टेस ही सुविधा केवळ दिवसा दिली जाईल. रात्रीच्या वेळी ही सुविधा उपलब्ध नसेल. ज्या प्रमाणे विमानांमध्ये असलेल्या एअर होस्टेस प्रशिक्षित असतात, त्याप्रमाणे ट्रेन होस्टेसही प्रशिक्षित असतील. रेल्वेच्या वतीने त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल.

IRCTC च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीमियम ट्रेन्समध्ये होस्टेसची नियुक्ती करण्याचा मुख्य उद्देश हा आहे की प्रवाशांनी उत्तमोत्तम सुविधा मिळाव्यात. त्यांना रेल्वेत चढण्यात, उतरण्यात, आपल्या जागी बसण्यात मदत व्हावी, त्यांना आवश्यक त्या गोष्टी आपल्या जागीच मिळाव्यात यासाठी ही सुविधा देण्यात येणार आहे. एका डब्ब्यात एक महिला आणि एक पुरुष नियुक्त करण्याची योजना असल्याचंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं. ज्या प्रीमियम ट्रेन्स १२ ते १८ तासात आपला प्रवास पूर्ण कऱणार आहेत, त्यांच्यामध्येच ट्रेन होस्टेस ही सुविधा पुरवली जाणार आहे.

Post a Comment

0 Comments