लष्कराच्या तुकडीविरोधात नोंदवला एफआयआर

लष्कराच्या तुकडीविरोधात नोंदवला एफआयआर 

१४ नागरिकांच्या हत्येचा नागालँड पोलिसांनी लावला आरोप!

वेब टीम मोन : नागालँडमधील मोन जिल्ह्य़ात सुरक्षा जवानांनी केलेल्या गोळीबाराच्या दोन घटनांमध्ये शनिवारी रात्री सहा खाण मजुरांसह १४ नागरिक ठार झाले, तर ११ हून अधिक जखमी झाले. त्यानंतर उसळलेल्या दंगलीत एका जवानाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खबळबळ उडालेली असताना आता नागालँड पोलिसांनी शनिवारीच या प्रकरणी भारतीय लष्कराच्या २१ पॅरा विशेष दलाच्या तुकडी विरोधात स्वत: दखल घेत एफआयआर नोंदवला आहे.

एफआयआरमध्ये नागालँड पोलिसांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, पॅरा स्पेशल दलाने स्थानिक पोलिसांना सूचिक केले नव्हते किंवा कोणी पोलीस गाइड देखील घेतला नव्हता. तसेच, एफआयआरमध्ये पोलिसांनी “नागरिकांना मारण्याचा आणि जखमी करण्याचा सुरक्षा दलाचा हेतू” असे नमूद केले आहे.

गोळीबाराची पहिली घटना शनिवारी संध्याकाळी जवानांच्या गैरसमजातून घडल्याचे म्हटले जात आहे. काही खाण मजूर एका वाहनातून परतत होते. ते मजूर म्हणजे ‘नॅशनल सोश्ॉलिस्ट काऊन्सिल ऑफ नागालँड’च्या (एनएससीएन- के) ‘युंग आँग’ गटाचे बंडखोर आहेत, असा समज करून सुरक्षा जवानांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात सहा मजूर ठार झाले.

कामगार घरी परतले नसल्याने काही स्थानिक तरुण आणि ग्रामस्थ त्यांचा शोध घेण्यासाठी जात असताना त्यांना लष्करी वाहनांनी घेरले. त्यानंतर ग्रामस्थ आणि जवान यांच्यात झालेल्या दंगलीत एका जवानाचा मृत्यू झाला. या वेळी जवानांनी ग्रामस्थांवर पुन्हा गोळीबार केला. त्यात आणखी सात नागरिकांचा बळी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नागालँड सरकारने या घटनांच्या चौकशीसाठी पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, ही घटना जवानांनी नागरिकांना ओळखण्यात चूक केल्याने घडली की त्यामागे अन्य काही कारण आहे, याची चौकशी केली जात आहे, असे राज्य सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

नागालँड मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची ग्वाही दिली असून सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments