लढाऊ विमानाचा नवा कोरा टायरच चोरट्यांनी केला लंपास

लढाऊ विमानाचा नवा कोरा टायरच चोरट्यांनी केला लंपास

 घटना लखनौमध्ये घडली असून पोलिसांकडून चौकशी  सुरू 

वेब टीम लखनौ :  लखनौमध्ये एक खरीखुरी बॉलिवुड स्टाईल चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आणि या चोरीमध्ये सोनं-चांदी किंवा रोकड वगैरेची  चोरी झालं नसून थेट भारताच्या मिराज-२००० या लढाऊ विमानाचा नवा कोरा टायरच चोरीला गेला आहे. विशेष म्हणजे ट्रॅफिक जामचा फायदा घेऊन चोरट्यांनी हा टायर लंपास केला असून त्यासोबत ठेवण्यात आलेल्या रिफ्युलर वेहिकल, बॉम्ब ट्रॉली, युनिव्हर्सल ट्रॉली, जेटचे मेन टायर यांना चोरट्यांनी हात लावलेला नाही. लढाऊ विमानाचा  टायर चोरीला गेल्यामुळे  पोलीसही बुचकळ्यात पडले असून अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

         ही घटना   २७ नोव्हेंबर रोजी लखनौजवळच्या शाहीन पथ परिसरामध्ये घडली . बक्षी का तालाब परिसरातील एअरबेसवरून जोधपूरच्या दिशेनं एक ट्रक २७ नोव्हेंबर रोजी निघाला. हेम सिंह रावत हे हा ट्रक चालवत होते. त्यांचा ट्रक  शाहीन पथ परिसरामध्ये ट्रॅफिकमध्ये अडकला. ट्रॅफिक व्यवस्थापन करण्यासाठी अवजड वाहनांना एका बाजूला रांगेत उभं करून एकेक करून सोडण्यात येत होतं. पण चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत लढाऊ विमानाचा  नवा कोरा टायर लंपास केला.

हेम सिंह रावत यांनी  पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून चोरी नेमकी कशी झाली, याचा घटनाक्रम पोलिसांनी नमूद केला आहे. हेम सिंह रावत ट्रकमधून लढाऊ विमानाचे  नवे कोरे स्पेअर पार्ट्स जोधपूरला घेऊन जाण्यासाठी निघाले. ट्रक शाहीन पथ परिसरात आल्यानंतर ट्रॅफिक जाममध्ये अडकला. यावेळी ट्रकमध्ये सहा टायर होते. आशियाना परिसरामध्ये त्यांचा ट्रक ट्रॅफिकमध्ये उभा असताना अचानक  बाजूने जाणाऱ्या एका व्यक्तीने काही लोक ट्रकवर लोड असलेल्या समानाशी छेडछाड करत असल्याचं सांगितलं.

ड्रायव्हिंग सीटवरून उतरून मागे जात असताना त्यांना एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ भरधाव वेगाने बाजूने जाताना दिसली. या स्कॉर्पिओचं मागचं दार उघडं होतं आणि त्यातून बाहेर काहीतरी लटकताना दिसत होतं. ट्रकच्या मागच्या बाजूला आल्यानंतर हेमसिंह रावत यांना घडला प्रकार लक्षात आला. सहा टायरपैकी एक टायर चोरट्यांनी लंपास केला होता. टायर बांधलेला नायलॉनचा रोप तुटलेल्या अवस्थेत होता.हेमसिंह रावत यांनी तातडीने पोलीस कंट्रोल रूमला फोन करून घडला प्रकार सांगितला. यानंतर त्यांची तक्रार लिहून घेण्यात आली. 

Post a Comment

0 Comments