ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नव्याने निर्बंध?

ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नव्याने निर्बंध?

वेब टीम मुंबई : करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनने संपूर्ण जगावर भीतीचं सावट निर्माण केलं असताना गुरुवारी केंद्र सरकारने दोन रुग्ण कर्नाटकात आढळल्याची माहिती दिली. यामुळे ओमायक्रॉनने भारतात प्रवेश केल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘ओमायक्रॉन’चे रुग्ण आढळले असले तरी लोकांनी भयभीत न होता करोना प्रतिबंधांचे नियम पाळावेत आणि लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य मंत्रालयाच्या वतीने करण्यात आलं आहे. करोना नियमांचे पालन करावे आणि गर्दीचे कार्यक्रम टाळावेत. तसेच लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याची गरज असून, संपूर्ण लसीकरण करण्यात दिरंगाई करू नये, असेही केंद्रीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यादरम्यान महाराष्ट्रात सुरक्षेच्या दृष्टीने नवी नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. 

ओमायक्रॉनसंबंधी लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केलं जात असल्याचा आरोप यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केला. तसंच लोकांनी घाबरुन जाऊ नये असं आवाहन केलं. ते म्हणाले की, “ओमायक्रॉनसंबंधी लोकांमध्ये फार दहशतीचं वातावरण निर्माण केलं गेलं असं माझं स्पष्ट मत आहे. म्युकरमायकोसिसची जितकी तीव्रता होती किंवा जेवढं नुकसान होत होतं तसं यात काही नाही. लोकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही”.

पुढे बोलताना ते म्हणाले की, “या राज्यातील नागरिकांची सुरक्षा करणं सरकारचं काम आहे. मुख्यमंत्री याबाबत संवेदनशील आहेत. मुख्यमंत्री तज्ज्ञांशी चर्चा करत असून दोन दिवसांमध्ये नियमावलीसंबंधी निर्णय होईल”.

आफ्रिकेसह अन्य देशांतून प्रवास करून आलेल्या प्रवाशांपैकी २५ जण करोनाबाधित असल्याचे आढळले. यांच्या सहवासातील तीन जणांना करोनाची बाधा झाली असून, एकूण २८ जणांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. गेल्या २४ तासांत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ८६१ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली. त्यापैकी तीन जण बाधित असल्याचे आढळले.

परदेशांतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवसांचे विलगीकरण बंधनकारक करण्याच्या महाराष्ट्राच्या आदेशाबाबत केंद्राने आक्षेप घेतल्यानंतर सरसकट सर्व देशांऐवजी जोखमीच्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांचे विलगीकरण करण्याचा सुधारित आदेश गुरुवारी राज्य सरकारने जारी केला. दक्षिण आफ्रिका, झिंब्बाब्वे आणि बोट्सवाना या सध्याच्या जोखमीच्या देशांमधून (हाय रिस्क कंट्रीज) येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी करून त्यांचे १४ दिवसांचे सक्तीने विलगीकरण करण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments