आतापर्यंत ९ हजारापेक्षा जास्त कर्मचारी निलंबित

आतापर्यंत ९ हजारापेक्षा जास्त कर्मचारी निलंबित 

वेब टीम मुंबई : एसटी महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरूच ठेवली असून आतापर्यंत ९ हजार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. गुरुवारी ४९८ कर्मचाऱ्यांना निलंबित केले.

विलीनीकरणाच्या मागणीसाठी २९ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. संप मिटत नसल्याने कठोर कारवाईचा बडगा उगारून संपावर गेलेल्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना महामंडळाने निलंबित केले. आतापर्यंत ९ हजार १४१ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे तर रोजंदारीवरील ३६ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली. एकूण १ हजार ९२८ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती झाल्याची माहिती महामंडळाने दिली. ही कारवाईही यापुढे सुरू ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, गुरुवारी ९२ हजार २२६ पैकी १८ हजार ८८२ कर्मचारी हजर असल्याची नोंद झाली. उर्वरित कर्मचारी अद्यापही संपात सामील आहेत. त्यामुळे सायंकाळी सहापर्यंत १ हजार ३४८ गाडय़ाच धावू शकल्या. यात साध्या गाडय़ांची संख्या १ हजार १०५ आहे, तर उर्वरित शिवशाही व शिवनेरी गाडय़ा आहेत.

एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासंदर्भात अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय राज्य सरकार काहीही करू शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी एसटी कर्मचारी संपाबाबत मांडली. 

Post a Comment

0 Comments