एस टी वर दगडफेक एक जखमी ; चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

एस टी वर दगडफेक एक जखमी ; चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न 

वेब टीम शेवगाव : जिल्ह्यात इतर सर्व एसटी डेपो बंद असताना शेवगाव एसटी बस आगारातील कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेत शुक्रवार पासून काम सुरू केले आहे. सामान्य प्रवासातून त्यामुळे समाधान व्यक्त होत असतानाच आगारातून रस्त्यावर धावणाऱ्या एसटी बसेसवर दगडफेकीच्या घटना घडत आहे. आज रविवारी शेवगाव-नेवासा ही बस नेवासेहुन शेवगाव कडे परतत असताना बसवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. बसच्या समोरील बाजूने आणि चालकाच्या दिशेने दगडफेक करण्यात आली.

भानसहिवरा गावानजीक बेलेश्वर विद्यालय इथे बस असताना काही अज्ञातांनी दगडफेक केली.

यात बसची काच फुटून एक मोठा दगड चालक दत्तात्र्यय नारायण काकडे यांच्या मानेवर लागला. यात काकडे यांचे मान ते खांद्या दरम्यान असलेल्या हाडाला मोठी इजा झाली असून त्यांना नगर येथील भालसिंग रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. शेवगाव आगार प्रमुखांनी स्वतः काकडे यांना नगरमध्ये आणत रुग्णालयात भरती केले असल्याची माहिती कामगार संघटनेचे दिलीप लबडे यांनी दिली आहे.

दुसऱ्या एका घटनेत शेवगाव एसटी डेपोत कार्यरत असलेले चालक सतीश जीवन दगडखैर (वय 47) यांनी रात्रीच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. दगडखैर हे पाथर्डी तालुक्यातील लोहसखांडगावचे आहे. राहत्याघरी घरीच त्यांनी विष प्राशन केले. त्यांना घरच्यांनी तातडीने नगर इथे आणत येथील सोनार रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आणि सुरक्षित असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. सण 2005 पासून ते शेवगाव डेपोत कार्यरत आहेत. त्यांच्या मुलाने सांगितले की, महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी ते आग्रही होते,त्याच तणावातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, तातडीने त्यांच्यावर उपचार झाल्याने त्यांची प्रकृती ठीक आहे.

Post a Comment

0 Comments