शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येतील : रामदास आठवले

शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येतील : रामदास आठवले 

वेब टीम सांगली : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जास्त काळ टिकणार नाही. अडीच वर्ष पूर्ण होताच पुन्हा शिवसेना आणि भाजप एकत्र येतील. मार्च किवा एप्रिलमध्ये राज्यात सत्ता बदल होईल, असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. ते आज सांगलीत पत्रकारांशी बोलत होते. केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या सत्ताबदलाच्या वक्तव्याला आठवले यांनी दुजोरा दिला.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींसह दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनावर भाष्य केले. नारायण राणे यांनी मार्च २०२२ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार जाईल, असे भाकीत काल केले आहे. त्याबद्दल विचारणा केली असता रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. नारायण राणे यांचे वक्तव्य बरोबर आहे. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात जास्त काळ टिकणार नाही. अडीच वर्षांनंतर राज्यातलं सरकार जाईल. त्यानंतर भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन नवे सरकार स्थापन होईल, असं ते म्हणाले.

केंद्राने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले असून, आता शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेणे गरजेचे आहे. आंदोलन मागे घेतले नाही तर मग शेतकरी नेते राकेश टिकैत आणि अन्य आंदोलकांवर कडक कारवाई करावी लागेल, असा इशारा देखील रामदास आठवले यांनी दिला आहे. करोनाच्या नव्या स्ट्रेनचा सामना करण्यासाठी उद्या दिल्लीत मंत्र्यांची महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Post a Comment

0 Comments