चीनने आपला प्रदेश गिळंकृत केल्याचं मोदी मान्य करतील का?”; भाजपा खासदाराचा घरचा आहेर
वेब टीम नवी दिल्ली : मागील दोन वर्षांपासून सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष या वादाला कारणीभूत ठरलेले आणि दिल्लीच्या सीमांजवळ आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमुळे चर्चेत असणारे तीन कृषी कायदे केंद्रातील मोदी सरकारने रद्द करण्याची घोषणा आज केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: यासंदर्भातील घोषणा केलीय.
पंतप्रधानांनी केलेल्या या घोषणेनंतर हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असून पंजाब, उत्तर प्रदेशमधील निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घेण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांबरोबरच इतर विरोधी पक्षांकडून केला जातोय. मात्र असं असतानाच दुसरीकडे भाजपाचेच्या एका खासदाराने आता मोदी चीनच्या खुसखोरीची गोष्टही मान्य करतील का असा प्रश्न उपस्थित केलाय.
भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी हे कायमच केंद्र सरकारविरोधात कठोर भूमिका घेताना दिसतात. अनेकदा ते केंद्रातील मोदी सरकारला वेगवेगळ्या विषयांवरुन टोले लगावत असतात. असाच एक टोला त्यांनी आता कृषी कायदे मागे घेण्यासंदर्भात लगावलाय. चीनने आपल्या भूभागावर (भारताच्या हद्दीतील प्रदेशावर) ताबा मिळवला हे आता तरी मोदी हे मान्य करतील का? तसेच मोदी आणि त्यांच्या सरकारला चीनच्या ताब्यातील इंच इंच जमीन परत घेण्यासाठी झगडावे लागणार आहे हे सुद्धा ते मान्य करतील का?, अशा अर्थाचे प्रश्न स्वामी यांनी उपस्थित केले आहेत.
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी मोदी सरकारने आगामी काळात काही राज्यांमध्ये होऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेतल्याचा टोला लगावला आहे.
“लोकशाही मार्गाने आंदोलन करुन जे साध्य करताना आलं नाही ते निवडणूकीच्या भीतीने साध्य झालं. पंतप्रधानांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यासंदर्भात केलेली घोषणा ही धोरणांमधील बदलांमुळे किंवा हृदय परिवर्तन झाल्यामुळे नसून निवडणुकांच्या भीतीमुळे घेण्यात आलीय,” असं पी. चिदम्बरम यांनी म्हटलं आहे. हा शेतकऱ्यांचा सर्वात मोठा विजय आहे. तसेच काँग्रसने सतत या कृषी कायद्यांना केलेल्या विरोधाचा हा विजय आहे,” असंही चिदम्बरम म्हणालेत.
0 Comments