१४ वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या, आरोपी पसार; शेतावर गेली होती पीडित मुलगी

१४ वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या, आरोपी पसार; शेतावर गेली होती पीडित मुलगी

 वेब टीम भरूच : गुजरातच्या भरूचमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. भरूच जिल्ह्यातील अमोद परिसरात एका अज्ञात व्यक्तीने १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील अमोद तालुक्यात ही घटना घडली. अमोद परिसरातील सरभन गावात सोमवारी संध्याकाळी मुलीचा मृतदेह सापडला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर आली. मुलीचा गळा आवळून तिची हत्या करण्यात आली होती. हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता, असे अहवालात स्पष्ट झाले आहे.


शेताजवळ सापडला मृतदेह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी सोमवारी दुपारी लाकूडफाटा गोळा करण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. मात्र, संध्याकाळ झाली तरी ती परतली नाही. तिचा मृतदेह शेताजवळ आढळून आला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. मुलीचा मृतदेह रुग्णालयात नेला. शवविच्छेदनानंतर हत्या करण्यापूर्वी मुलीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी विविध कलमान्वये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहणी करून तपास सुरू केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेसह विविध पोलीस पथके स्थापन केली असून, आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments