राफेल विमान खरेदीत मध्यस्थाला ६४ कोटी ! ; फ्रेंच माध्यम ‘मीडियापार्ट’चा नवा दावा

राफेल विमान खरेदीत मध्यस्थाला ६४ कोटी ! ; फ्रेंच माध्यम ‘मीडियापार्ट’चा नवा दावा

या प्रकरणाची चौकशी न करण्याचा निर्णय घेतला, हे आपण उघड करू शकतो, असेही ‘मीडियापार्ट’ने म्हटले आहे

वेब टीम नवी दिल्ली : भारताने खरेदी केलेल्या राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहारात फ्रेंच कंपनी ‘दसाँ एव्हिएशन’ने एका मध्यस्थाला ७.५ मिलियन युरो (सुमारे ६४ कोटी रुपये) कमिशन दिल्याचा नवा दावा ‘मीडियापार्ट’ या फ्रेंच माध्यमाने आपल्या रविवारच्या वृत्तामध्ये केला आहे.

३६ राफेल विमानांच्या खरेदी व्यवहार सुरळीतपणे व्हावा यासाठी दसाँ एव्हिएशनने एका मध्यस्थाला ७.५ मिलियन युरो कमिशन दिले. त्यासाठी बनावट पावत्या (इनव्हॉइस) तयार करण्यात आल्या. तसेच याबाबतची कागदपत्रे उपलब्ध असूनही तपास यंत्रणांनी चौकशी केली नाही, असे ‘मीडियापार्ट’च्या या वृत्तामध्ये म्हटले आहे. या खरेदी व्यवहारात परदेशी कंपन्या, संशयास्पद कंत्राटे आणि बनावट पावत्यांचा समावेश असल्याचा दावाही या वृत्तात करण्यात आला आहे.  दसाँ एव्हिएशनने सुशेन गुप्ता या मध्यस्थाला सुमारे ६४ कोटी रुपये कमिशन दिल्याचे पुरावे केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) यांच्याकडे ऑक्टोबर २०१८पासून होते. तरीही त्यांनी या प्रकरणाची चौकशी न करण्याचा निर्णय घेतला, हे आपण उघड करू शकतो, असेही ‘मीडियापार्ट’ने म्हटले आहे.

मध्यस्थाला सुमारे ६४ कोटी रुपये कमिशन देऊन दसाँ एव्हिएशनने ३६ राफेल विमाने भारताला विकण्याचा यशस्वी व्यवहार केला, असा आरोपही या वृत्तामध्ये करण्यात आला आहे.

दरम्यान, ‘मीडियापार्ट’च्या या नव्या दाव्याबाबत दसाँ एव्हिएशन किंवा भारताच्या संरक्षण विभागाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Post a Comment

0 Comments