भाऊबीजेच्या दिवशीच त्या तिघींनी गमावला आपला भाऊ
वेब टीम मनमाड : साेशल मीडियावर जुळलेले प्रेमप्रकरण तरुणाच्या जीवावर बेतले,मनमाड रेल्वे स्थानकात ऐन भाऊबिजेच्या दिवशी शिवम संजय पवार (२१) या तरुणाच्या खुनात झाले. तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ आणि आई वडिलांच्या लाडक्या मुलाचा खून झाल्याने चांदवडच्या उसवड गावातील पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
चांदवड तालुक्यातील उसवड या गावी राहणाऱ्या शिवमला तीन बहिणी आहेत. संजय जगन्नाथ पवार यांचा ताे एकुलता एक मुलगा हाेता. उल्हास नगर येथे राहणाऱ्या एका तरुणी सोबत (वय २०) इंस्टाग्रामवरुन त्याची अडीच वर्षांपूर्वी ओळख झाली. या दोघांचे प्रेमप्रकरण सुरू होते. दोघेही एकमेकांच्या संपर्कात असतांना आपली प्रेयसी तिच्या आणखी तीन मित्रांसोबत फिरते, फोनवर बोलते आणि मेसेजवर चॅटिंग करत असल्याचा राग शिवमच्या मनात होता.
त्याच शिवमचे या तिघांमधील एकासोबत आणि प्रेयसीशी फोनवर जोरदार भांडण झाले. त्याचा राग मनात धरून शिवमने यातील चेतन आणि मोहित या दाेन तरुणांच्या नावाने इंस्टाग्रामवर नकली प्राेफाइल तयार करुन त्यावर त्यांचे अश्लील फोटो टाकले. त्यावर चेतनने शिवमला फोन करून याबाबत विचारणा केली.
‘मीच तुझे नकली प्राेफाइल तयार केले असून तू माझ्या प्रेयसीसोबत संपर्क ठेवू नको, नाहीतर तुला आणखीन बदनाम करेन’, अशी धमकी शिवमने पुन्हा दिल्यामुळे फोनवरच तिघांचे पुन्हा एकदा जाेरदार भांडण झाले. ‘तू आमच्या सोबत एकाच ठिकाणी कामावर राहतेस, म्हणून चिडलेल्या शिवमने मीडियावरून आमची बदनामी सुरू केली आहे, त्याचा गैरसमज दूर करण्यासाठी तू त्याला इकडे बोलावून घे, असे या तिघांनी संबंधित तरुणीला सांगितले.
तिने शिवमला कल्याणला बाेलावण्यासाठी दूरध्वनी केला असता, त्यानेच या सर्वांना मनमाडला बाेलावून घेतले. त्यानुसार चेतन, मोहित, नील आणि मयूर या चार मित्रांसह संबंधित तरुणीने कल्याण स्टेशनवरुन शुक्रवारी सायंकाळी पंचवटी एक्स्प्रेसमध्ये बसून रात्री ११:३० वाजता मनमाड स्टेशन गाठले. तेथे त्यांची शिवमशी भेट झाली.
मात्र ताे रागाच्या भरात काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून या पाचही जणांनी मनमाडहून पुन्हा कल्याणला जाण्यासाठी फलाट क्रमांक ४ वरील नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये बसण्याचा विचार केला. ते गाडीत बसण्यासाठी जातांनाच पुन्हा शिवम मागून आला आणि त्यांच्यात पुन्हा भांडण व शिविगाळ झाली.
माेहीतने शिवमला हे नकली प्राेफाइल बंद करून टाक, आपण हा वाद संपवून टाकू, असे सांगितले. मात्र ताे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे माेहीत व मयूर यांनी शिवमवर चाकूने सपासप वार केले आणि स्टेशनवरून सुटलेली धावती गाडी पकडून ते फरार झाले.
रक्ताच्या थाराेळ्यात पडलेल्या शिवमला पाहून संबंधित तरुणीने मदतीसाठी आरडाओरडा केला. आजूबाजूच्या लाेकांनी माहिती देताच पाेलिस तेथे आले. त्यांनी त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वार वर्मी लागल्यामुळे जखमा खाेलवर व गंभीर असल्याने त्याचा मृत्यू झाला. पाेलिसांनी या तरुणीला ताब्यात घेतले असून तिच्या चार मित्रांविराेधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
0 Comments