अनेक दिवस बेपत्ता राहिल्यानंतर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर

अनेक दिवस बेपत्ता राहिल्यानंतर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर 

वेब टीम मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटी रुपये वसुलीचा गंभीर आरोप केला. त्यानंतर या प्रकरणी ईडीने चौकशी सुरू केली. मात्र, अचानक अनिल देशमुख बेपत्ता झाले. आज (१ नोव्हेंबर) अनेक दिवसांनंतर अनिल देशमुख स्वतः ईडी कार्यालयात हजर झालेत. तसेच त्यांनी या प्रकरणावर आपली बाजू मांडणारा व्हिडीओ ट्वीट केलाय. त्यांनी आपलं शेवटचं ट्वीट २ जुलैला केलं होतं. त्यानंतर आज त्यांनी ट्विटरवर आपली भूमिका स्पष्ट केली.

अनिल देशमुख यांनी व्हिडीओ ट्वीट करत आपली बाजू मांडली आहे. या व्हिडीओत ते म्हणाले, “नमस्कार मी अनिल देशमुख बोलतोय. मला जेव्हा ईडीचा समन्स आला तेव्हा मी ईडीला सहकार्य करत नाही अशा चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या. मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा मला ईडीचा समन्स आला तेव्हा तेव्हा मी त्यांना कळवलं की माझी याचिका उच्च न्यायालयात आहे. त्याची सुनावणी चालू आहे. मी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केलीय. त्याचा निकाल आल्यानंतर मी स्वतः ईडीच्या ऑफिसमध्ये येईल.”

“ईडीने जेव्हा आमच्या सर्व घरांवर छापे टाकले, तेव्हा मी व माझ्या परिवाराने, माझ्या सहकाऱ्यांनी सर्वांनी ईडीला सहकार्य केलं. सीबीआयचे मला दोनदा समन्स आले. त्या दोन्ही वेळा मी स्वतः सीबीआयच्या कार्यालयात जाऊन माझा जबाब दिला. अजूनही माझी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आज मी स्वतः ईडीच्या कार्यालयात हजर झालोय,” असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

अनिल देशमुख म्हणाले, “मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर खोटे आरोप केलेत. माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंह आज कुठे आहेत? प्रसार माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांनुसार परमबीर सिंह भारत सोडून परदेशात पळून गेले आहेत. आरोप करणाराच पळून गेला. आज पोलीस खात्यातील अनेक अधिकारी, व्यवसायिक यांनी पोलीस स्टेशनला परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.”

Post a Comment

0 Comments