भाजपा,आरएसएसशी लढण्यासाठी पक्षामध्ये “शिस्त आणि ऐक्याची अत्यंत गरज”
वेब टीम नवी दिल्ली : आगामी काळात होणाऱ्या पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये आज सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, प्रदेश प्रभारी आणि सरचिटणीस यांची उपस्थिती होती. शिवाय, राहुल गांधी व प्रियंका गांधींसह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची देखील बैठकीस हजेरी होती. यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांना संबोधित करताना, भाजपा आणि आरएसएसशी लढण्यासाठी पक्षामध्ये “शिस्त आणि ऐक्याची अत्यंत गरज” असल्याचे म्हटले.
काँग्रेसचे सरचिटणीस, प्रदेशाध्यक्ष आणि इतर नेत्यांशी बोलताना सोनिया गांधी मंगळवारी म्हणाल्या, “आपण भाजपा,आरएसएसच्या वैचारिक मोहिमेशी लढा दिला पाहिजे. जर आपल्याला ही लढाई जिंकायची असेल तर आपण नक्कीच असे केले पाहिजे आणि लोकांसमोर त्यांचा खोटारडेपणा उघड केला पाहिजे . ”
“एआयसीसी देशासमोरील समस्यांवर जवळजवळ दररोज महत्त्वपूर्ण आणि तपशीलवार विधाने जारी करते. पण ब्लॉक आणि जिल्हा स्तरावरील आमच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत ते पोहचत नाहीत, असा माझा अनुभव आहे. काही धोरणात्मक मुद्दे आहेत ज्यावर मला आमच्या राज्यस्तरीय नेत्यांमध्ये स्पष्टता आणि समन्वयाचा अभाव दिसत आहे,” असंही सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या.
याचबरोबर सोनिया गांधी यांनी, काँग्रेस अनेक राज्यांमध्ये बंडखोरी आणि अंतर्गत कलहाला सामोरं जात असताना त्यांनी पक्षात शिस्त आणि ऐक्याचे आवाहन केले.
“मी शिस्त आणि एकजुटीच्या नितांत आवश्यकतेवर पुन्हा जोर देऊ इच्छिते. आपल्यापैकी प्रत्येकासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघटना मजबूत करणे ही आहे. त्यासाठी वैयक्तिक महत्वाकांक्षा बाजूला ठेवणे आवश्यक आहे. यातच सामूहिक आणि वैयक्तिक यश दडलेले आहे, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.
0 Comments