पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने

नरकचतुर्दशीला भ्रष्ट लोकप्रतिधींना लोकशाही सत्तासूर घोषित करणार

वेब टीम नगर :  निवडणुकीत जनतेला दिलेली आश्‍वासने न पाळता, सत्तेचा वापर फक्त स्वत:च्या फायद्यासाठी करणार्‍या सत्ताधारी व भ्रष्ट लोकप्रतिधींना नरकचतुर्दशीला गुरुवार दि. 4 नोव्हेंबर रोजी हुतात्मा स्मारकात पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने लोकशाही सत्तासूर घोषित करण्यात येणार आहे. तर अशा सत्ताधारी व भ्रष्ट लोकप्रतिधींच्या विरोधात डिच्चू कावा करुन त्यांना घरचा रस्ता दाखविण्याचे आवाहन केले जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी व अशोक सब्बन यांनी दिली.  

निवडणुकीमध्ये मोठी आश्‍वासने देणारे उमेदवार निवडून आल्यानंतर जनतेला विसरून जातात. लोकशाहीत सत्तेचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी करतात. भ्रष्टाचारातून मोठ्या प्रमाणात संपत्ती कमवितात. यामुळे 75 वर्षानंतरही जनतेला स्वातंत्र्याची फळे मिळू शकलेली नाहीत. अशा भ्रष्ट लोकप्रतिधींच्या विरोधात संघटनेने पुढाकार घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूविरुद्ध गनिमी कावा तर स्वराज्याशी फितूरी करणार्‍यांविरुद्ध डिच्चू कावा वापरला. अशा फंदफितूरांचा जाहीर रीतीने कडेलोट केला. म्हणून महाराजांच्या डिच्चू कावा तंत्राचा वापर देशातील सर्व मतदारांनी करावा यासाठी अभियान जारी करण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.

निवडणुकीतील उमेदवार मतासाठी पैसे देतात. कोंबड्या, दारू याचा सर्रास वापर करतात आणि विशेष म्हणजे मतदाराच्या हातावर जोंधळा देऊन मुलाबाळांची शपथ देखील घ्यायला भाग पाडतात. उमेदवारांच्या दहशतीमुळे मतदारांना पैसा परत देता येत नाही. अशा परिस्थितीत मतदारांना मतदानाच्या वेळी योग्य उमेदवारांना मतदान करुन भ्रष्ट उमेदवारांना घरचा रस्ता दाखविण्यासाठी डिच्चूकावा तंत्राद्वारे सार्वजनिक जीवनातून खड्यासारखे दूर करण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. लोकशाहीत जनतेशी फितूरी करुन स्वत:चे घरे भरणार्‍यांविरोधात डिच्चूकावा तंत्र प्रभावी ठरणार आहे. यामुळे भ्रष्टाचारी, टोलवाटोलवी, अनागोंदी करणारे आणि टक्केवारी मध्ये आकंठ बुडालेल्या लोकप्रतिनिधींना सार्वजनिक जीवनातून दूर करण्याचा हा भाग असल्याचे अशोक सब्बन यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments