मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत असे वाटल्यास योगींना पुन्हा मुख्यमंत्री करा : अमित शहा
वेब टीम लखनऊ : उत्तर प्रदेशात २०२२मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजपाच्या मेगा सदस्यत्व मोहिमेसाठी आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या बैठका घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लखनऊमध्ये आहेत. “लोकांना नरेंद्र मोदींना २०२४ मध्ये पंतप्रधान म्हणून पाहायचे असेल तर २०२२ च्या उत्तर प्रदेश निवडणुकीत त्यांनी योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करावी,” असं आवाहन त्यांनी जनतेला केलंय.
शुक्रवारी लखनऊ येथे एका मेळाव्याला संबोधित करताना केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले, “आम्ही उत्तर प्रदेशातील जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत, परंतु यूपीला देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवण्यासाठी अजून पाच वर्षांची गरज आहे. पीएम मोदी हे देखील यूपीचे खासदार आहेत आणि जर तुम्हाला त्यांना २०२४ मध्ये पंतप्रधान म्हणून पाहायचे असेल तर तुम्हाला २०२२ मध्ये योगी आदित्यनाथ यांना यूपीचे मुख्यमंत्री बनवावे लागेल. मला खात्री आहे की तुम्ही २०२४ मध्ये पीएम मोदींना पुन्हा संधी द्याल.”
समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर हल्लाबोल करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीची तारीख भाजपाचे लोक जाहीर करणार नाहीत, असे अखिलेश यादव म्हणाले होते. पण मी आठवण करून देऊ इच्छितो की त्यांच्याच सरकारने रामभक्तांना गोळ्या घातल्या होत्या. पण आमच्या राजवटीत लवकरच अयोध्येत भव्य राम मंदिर तयार होणार आहे. पूर्वी यूपी अर्थव्यवस्थेत सातव्या क्रमांकावर होते, पण भाजपा सत्तेत आल्यानंतर यूपी देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे,” असंही त्यांनी म्हटलं.
“करोना महामारीच्या काळात जेव्हा लोक काळजीत होते की यूपीचे 22 कोटी लोक सुरक्षित कसे राहतील, तेव्हा यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उल्लेखनीय काम करत हजारो लोकांचे प्राण वाचवले. उत्तर प्रदेशमध्ये करोनाच्या जास्तीत जास्त चाचण्या आणि लसीकरण करण्यात आले आहे,” असंही अमित शाह म्हणाले.
“सपा आणि बसपा सरकारने अनेक वर्षांपासून यूपीला त्यांचे खेळाचे मैदान बनवले होते. लोक यांना कंटाळून राज्यातून पलायन करत होते. मात्र, आज परिस्थिती बदलली आहे. यूपीमध्ये आता महिला रात्री १२ वाजताही दागिने घालून स्कूटी चालवू शकतात, इतक्या त्या सुरक्षित आहेत. तसेच आमच्या कार्यकाळात गरिबांना पक्की घरे आणि वीज देण्यात आली आहे,” असंही गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं.
0 Comments