एन सी बी वानखेडे ,साईल चा जबाब नोंदविणार ;वानखेडेंच्या बदलीची शक्यता

एन सी बी वानखेडे ,साईल चा जबाब नोंदविणार ;वानखेडेंच्या बदलीची शक्यता 

वेब टीम नवी दिल्ली : आर्यन खान प्रकरणात वादात सापडलेले अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मंगळवारी दिल्लीतील ‘एनसीबी’च्या मुख्यालयात उपमहासंचालकांसमोर आपली बाजू मांडली. मात्र, वानखेडे यांच्यावर झालेल्या कथित लाचखोरीच्या आरोपाची चौकशी करण्यात येणार असून, त्यासाठी चार वरिष्ठ अधिकारी  मुंबईला रवाना होणार असल्याचे समजते. या चौकशीमुळे वानखेडे यांच्या बदलीची शक्यता वर्तवली जात आहे.

समीर वानखेडे यांच्या विभागीय चौकशीसाठी उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग आणि त्यांचे विभागीय संचालक दर्जाचे तीन  सहकारी बुधवारी दिल्लीहून मुंबईला जातील. हे अधिकारी या प्रकरणाचे साक्षीदार किरण गोसावी व प्रभाकर साईल या दोघांचीही चौकशी करणार आहेत. 

मुंबईत क्रुझवरील अमली पदार्थ पार्टी प्रकरणातील साक्षीदार व पंच प्रभाकर साईल याने लाचखोरीचा आरोप केला असून, त्यात वानखेडेंचाही समावेश असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे वादात सापडलेल्या वानखेडे यांना ‘एनसीबी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्लीत बोलावून घेतले होते. वरिष्ठांच्या आदेशामुळे वानखेडे यांनी सोमवारी रात्री दिल्ली गाठली. मात्र, आपण ‘एनसीबी’च्या नियमित बैठकीसाठी आल्याचे त्यांनी सांगितले होते. मंगळवारी सकाळी वानखेडे यांनी ‘एनसीबी’च्या मुख्यालयात वरिष्ठांची भेट घेतली. सुमारे दीड तासांच्या भेटीनंतर वानखेडे मुख्यालयातून निघून गेले. वानखेडेंना पाठिंबा देण्यासाठी मुख्यालयासमोर समर्थकांनी गर्दी केली होती.

अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एसीबी) शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या विरोधात केलेल्या  कारवाईबद्दल आरोप करणारे एनसीबीचे पंच प्रभाकर साईलचा एनसीबी जबाब नोंदवणार आहे. हा जबाब गुरुवारी नोंदण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या पथकाकडून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा बुधवारी जबाब नोंदवण्यात येण्याची शक्यता आहे.

आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरुख खानकडे २५ कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यातील ८ कोटी रुपये अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे (एसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असा गंभीर आरोप एनसीबीचे पंच प्रभाकर साईलने केला होता.

आर्यन खान व अनन्या पांडे यांचे कथित संभाषण उघड झाले असून त्यात ते अमलीपदार्थांबद्दल संभाषण करत असल्याचे दिसून येत आहे. या कथित चॅटमध्ये अमलीपदार्थांसह एनसीबीचाही उल्लेख केला आहे. त्यात कोकेन व वीड(गांजा) सारख्या शब्दांचा उल्लेख आहे. याबाबत एनसीबीला विचारले असता त्यांच्याकडून याबाबत कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.

Post a Comment

0 Comments