आर.एस.एस. ची तुलना तालिबान बरोबर : अटकपूर्व जामीन फेटाळला
वेब टीम भोपाळ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही तालिबानी दहशतवादी संघटना असल्याचा आरोप करत ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने सोमवारी अटकपूर्व जामीन नाकारला आहे. न्यायमूर्ती राजेंद्र कुमार वर्मा यांच्या खंडपीठाने त्याला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. तसेच अर्जदाराविरुद्ध पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत आणि त्यामुळे त्याची याचिका फेटाळून लावली आहे, असं राजेंद्र वर्मा यांनी म्हटलंय.
सोशल मीडियावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तालिबानी दहशतवादी संघटना असल्याचा आरोप करत काही टिप्पण्या करून त्या व्हायरल केल्याचा आरोप आरोपीवर आहे. त्यामुळे त्याला अटकपूर्व जामिन दिला जाऊ शकत नाही, असं न्यायमूर्तींनी म्हटलंय. तर दुसरीकडे, अर्जदाराच्या वकिलाने असं म्हटलंय की, “राजकीय वैमनस्यमुळे अर्जदाराला या प्रकरणात खोटे गोवण्यात आले आणि त्याने कधीही कोणत्याही धर्म किंवा कोणत्याही संघटनेवर भाष्य केलेले नाही. तसेच त्याच्याविरुद्ध कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पुरावा नसून केवळ संशयाच्या आधारे त्याला आरोपी करण्यात आले होते, त्यामुळे त्याला अटकपूर्व जामीन मिळावा,” अशी मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, न्यायालयाने, खटल्यातील वस्तुस्थिती आणि परिस्थिती लक्षात घेऊन आणि केस डायरीसह रेकॉर्डवरील उपलब्ध सामग्री आणि अर्जदाराने केलेल्या गुन्ह्यांमधील त्याच्या भूमिकेचा तपास करून, त्याच्याविरुद्ध पुरेसे पुरावे उपलब्ध असल्याचे नमूद केले आणि त्यामुळे त्याची याचिका फेटाळल्याचं सांगितलं.
0 Comments