बांगलादेशात हिंदूंच्या घरांची जाळपोळ सुरूच; ५२ अटकेत

बांगलादेशात हिंदूंच्या घरांची जाळपोळ सुरूच; ५२ अटकेत


वेब टीम ढाका: बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू समुदायांवर धर्मांधांचे हल्ले सुरूच आहेत. कट्टरतावादी जमावाने हिंदूंच्या ६६ घरांचे नुकसान करून, वीस घरांना आगी लावल्या आहेत. रंगपूर जिल्ह्यातील पीरगंज येथे शंभराहून अधिक जमावाने रविवारी रात्री उशिरा जाळपोळ करण्यास सुरुवात केली. गेल्या आठवड्यात दुर्गा पूजेदरम्यान हिंदूंनी मंदिराच्या विद्ध्वंसाविरोधात निदर्शने केल्यानंतर समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाली. त्यानंतर हिंदूंविरोधात हिंसेला सुरुवात झाली.

सहायक पोलिस अधीक्षक महंमद कमरुझ्झमन यांनी हिंसेबाबत माहिती दिली. फेसबुकवर धर्माचा अवमान केल्याची अफवा पसरल्यानंतर हिंसेला सुरुवात झाली. पोलिस तातडीने घटनास्थळी रवाना झाले. रविवारी रात्री उशिरा हिंसेची घटना घडली. पण, अग्निशामक दलाने त्वरेने आग आटोक्यात आणली. या ठिकाणी परिस्थिती आता नियंत्रणात आहे. जीवितहानीचे वृत्त नसले, तरी ६६ घरांचे नुकसान झाले आहे, तर वीस घरे जळून खाक झाली आहेत.

हिंसाचार प्रकरणी ५२ अटकेत

हिंसेप्रकरणी ५२ संशयितांना अटक करण्यात आली असून, आणखी हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. सुमारे चारशे जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिस ज्या ठिकाणी उभे होते, ती ठिकाणे सोडून हल्लेखोरांनी इतर ठिकाणे जाळली. अग्निशामक दलाने सोमवारी पहाटेपर्यंत आग आटोक्यात आणली.

दुर्गा पूजेदरम्यान ईशनिंदा केल्याच्या आरोपावरून बांगलादेशातील कोमिला, चांदपूर, चट्टोग्राम, बांदरबन, गाझीपूर, फेनी या ठिकाणी येथे तणाव आहे. हिंदू मंदिरांना त्यावरून लक्ष्य केले जात आहे. या हल्ल्यांप्रकणी आत्तापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी आणि गुरुवारी उसळलेल्या हिंसेत हाझीगंज येथे चार जणांचा मृत्यू झाला होता, तर नौखाली जिल्ह्यात एकाचा मृतदेह आढळून आला होता. बांगलादेशात राजधानी ढाक्यासह इतर अनेक ठिकाणी दोन्ही समुदायांचे नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. बांगलादेशातील हिंदू-बुद्धिस्ट-ख्रिस्ती एकता मंडळाने ७० पूजा मंडपांवर आणि मंदिरांवर हल्ले झाल्याचे सांगितले, तर चार भाविकांचा आत्तापर्यंत मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.

Post a Comment

0 Comments