नेहरूंमुळेच काश्मिर भारतात - काँग्रेस नेता
वेब टीम नवीदिल्ली : काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सदस्यांनी गांधी कुटुंबाप्रती निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न केला. या बैठकीत काही वादग्रस्त वक्तव्येही समोर आली आहेत. काश्मीरच्या पीडीपीमधून सीडब्ल्यूसी सदस्य बनलेल्या तारिक हमीद कर्रा यांनी फक्त गांधी कुटुंबच भारताला एकसंध ठेवू शकते. त्यामुळे राहुल गांधींनी पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेकडे परत यावे असे म्हटले आहे. कर्रा यांनी जम्मू -काश्मीरची जनता भारतात फक्त नेहरूंमुळेच आहे असेही म्हटले आहे.
नेहरूंची स्तुती करताना तारिक हमीद कर्रा यांनी सरदार पटेल यांना लक्ष्य केले आहे. “जम्मू -काश्मीरचे लोक भारतात फक्त नेहरूंमुळेच आहेत. जम्मू -काश्मीर पाकिस्तानला सोपवण्यात पटेल जिनांच्या पाठीशी उभे राहिले,” असे तारिक हमीद कर्रा यांनी म्हटले आहे. मात्र ताबडतोब, सीडब्ल्यूसीच्या काही सदस्यांनी हस्तक्षेप करून बैठकीत अजेंड्याबद्दल बोलण्यास सांगितले आणि त्यांना आठवण करून दिली की पटेल हे भारताचे एकत्रीकरण करण्यासाठी योगदान दिलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष होते.
पक्ष बळकट करण्यासाठी गांधी कुटुंबाच्या कामांचे कौतुक करणे आणि त्यांच्या नेतृत्वावर कोणत्याही टीकेविरोधात चिंता मोहन यांनीही भाष्य केले. “माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे प्रमुख पीव्ही नरसिंह राव हे काँग्रेसच्या विचारधारेप्रती अप्रामाणिक होते. त्यांनी पक्ष नष्ट करण्याचे काम केले,” असे चिंता मोहन म्हणाले. २०१९च्या अमेठी निवडणुकीत राहुल गांधी यांचा पराभव षडयंत्राचा एक भाग असल्याचे पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला. तर “तृणमूल प्रमुख ममता बॅनर्जी ‘काँग्रेस विरुद्ध काँग्रेस’ बनवण्याच्या उद्देशाने अनेक काँग्रेस नेत्यांचे अपहरण करत आहेत. भाजपाला मदत करण्यासाठी तृणमूल गोव्यात निवडणूक लढत आहे,” असे अधीर रंजन चौधरी म्हणाले.
काँग्रेसच्या बैठकीदरम्यान एक विचित्र घटनाक्रम दिसून आला. सर्वप्रथम, सीडब्ल्यूसी सदस्यांनी सोनिया गांधींचे कौतुक केले, की त्या पूर्णवेळ, व्यावहारिक, काँग्रेस अध्यक्षा आहेत. त्यानंतर त्यांनी एकमताने संघटनात्मक निवडणुकीचे वेळापत्रक मंजूर केले. पुढील पक्षाध्यक्षांची निवड सप्टेंबर २०२२ मध्ये होईल असेदेखील यावेळी निश्चित केले. त्यांनी सोनिया यांना अध्यक्ष म्हणून पुढे काम पाहण्याचे आवाहन केले. त्यापैकी बहुतेकांनी राहुल गांधी यांनी ताबडतोब काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक न घेता पदभार स्वीकारला पाहिजे असे म्हटले.
0 Comments