देशातील रुग्णसंख्या २० हजारांपेक्षा कमी;सक्रिय रुग्णसंख्येतही घट
देशभरात गेल्या २४ तासांत करोना रुग्णसंख्येत मोठी घट पहायला मिळाली आहे
वेब टीम नवी दिल्ली : देशात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असताना दिलासादायक बातमी आहे. देशभरात गेल्या २४ तासांत करोना रुग्णसंख्येत मोठी घट पहायला मिळाली आहे. देशातील करोनाबाधितांची संख्या तब्बल २०१ दिवसांनी २० हजारांच्या खाली नोंदवण्यात आली आहे. २६ सप्टेंबरला देशभरात २६ हजार ४१ करोना रुग्णांची आणि २७६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी देशात १८ हजार ७९५ बाधितांची नोंद झाली असून १७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपासून देशातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील ३ लाखांपेक्षा कमी झाली आहे. देशात सध्या २ लाक ९२ हजार २०६ रुग्ण उपचाराधीन आहेत.
नवीन रुग्णसंख्येसह देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३ कोटी ३६ लाख ९७ हजार ५८१ झाली आहे. तर, आतापर्यंत ३ कोटी २९ लाख ५८ हजार २ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर, ४ लाख ४७ हजार ३७३ जणांना करोनामुळे जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत १ कोटी २ लाख २२ हजार ५२५ जणांना करोना लस देण्यात आली असून आतापर्यंत ८७ कोटी ७ लाख ८ हजार ६३६ जणांचं लसीकरण झालंय.
महाराष्ट्रातील करोना परिस्थिती..
राज्यात सोमवारी दिवसभरात २ हजार ८९५ रूग्ण करोनामधून बरे झाले असून, २ हजार ४३२ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, ३२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६३,६२,२४८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.२६ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,४१,७६२ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १३८९०२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
0 Comments