आरटीपीसीआर टेस्ट वाढवा : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे निर्देश

आरटीपीसीआर टेस्ट वाढवा : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे निर्देश

जिल्हयातील कोरोना उपाययोजनांचा घेतला आढावा

वेब टीम नगर : जिल्हयातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आज कोरोना आढावा बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना उपाययोजना आढावा बैठकीत विभागीय आयुक्त बोलत होते. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी  अधिकारी राजेंद्र  क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदिप  निचित, जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, महापालिकेचे आयुक्त गोरे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, जिल्हा शल्यचिकित्सक  पोखरणा यावेळी उपस्थित होते.

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आली तर त्याविरूद्ध लढण्यासाठी उपलब्ध असणारे बेड्स, ऑक्सिजन व इतर सुविधा यासंबंधी कोरोना नियंत्रणासाठी शासनाने जारी केलेल्या निर्बधासोबतच एका पॉझिटिव्ह रुग्णामागे त्याच्या संपर्कातील तीस व्यक्तींची तपासणी होणे आवश्यक असल्याचे विभागीय आयुक्तांनी बैठकीत सूचित केले. यासोबतच ज्या ठिकाणी कंटेमनमेंट झोन जाहिर करण्यात आला आहे तेथे नागरिकांच्या येण्याजाण्यावर निर्बंध घालणे, दहा टक्कयापेक्षा अधिक रुग्ण असलेल्या परिसरात लॉकडाऊन करणे, आठवडी बाजार बंद ठेवणे, मास्क न घालणाऱ्या ग्राहकांना सामान देणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करणे, मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, कोरोना संसर्गास कारणीभूत ठरणाऱ्या आणि प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या आस्थापना बंद करणे, होम आयसोलेशन बंद करणे, बंद कोविड सेंटर पुन्हा सुरु करणे, लसीकरण वाढविणे आदि उपाययोजना अंमलात आणण्याची सूचनाही विभागीय आयुक्तांनी केली. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी प्रशासनातर्फे जिल्हयात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी दिली.

Post a Comment

0 Comments