करुणा शर्मांचा जामीन अखेर मंजूर

करुणा शर्मांचा जामीन अखेर मंजूर  

वेब टीम बीड : कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी परळीत आलेल्या आणि त्यानंतर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झालेल्या करुणा शर्मा यांना अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. करुणा शर्मा यांना तब्बल 16 दिवस न्यायालयीन कोठडीत काढावे लागले आहे.

करुणा शर्मा यांनी आपण धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. त्यासाठी त्या परळी येथे आल्यानंतर एका महिलेला जातिवाचक शिविगाळ केली आणि प्राणघातक हल्ला केला म्हणून करुणा शर्मा यांच्यासह त्यांचा सहकारी अरुण मोरेंवर गुन्हा दाखल झाला होता. परळी पोलिसांनी 5 सप्टेंबर रोजी अटक केली होती. तर 6 सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यावरची सुनावणी पुढे ढकलली जात होती. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. अखेर आज न्यायालयाने करुणा शर्मांना जामिन मंजूर केला.

काय आहे प्रकरण?

मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी आलेल्या करुणा शर्मा यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशाखा रविकांत घाडगे यांनी करुणा शर्मा यांच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार कलम 307 आणि अॅट्रोसिटी कायद्याखाली हा करुणा शर्मा आणि अरुण दत्ता मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परळीमध्ये करुणा शर्मा दाखल झाल्यानंतर काल वैद्यनाथ मंदिरासमोर पायरीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना जमावाने त्यांना अडवलं व घेराव घालण्याचा प्रयत्न केला होता.


Post a Comment

0 Comments