शेवगाव तालुक्यातील मौजे चेडेचांदगाव, कोनोशी, राणेगाव,बेलगाव १० वर्षापासून अंधारात

शेवगाव तालुक्यातील मौजे चेडेचांदगाव, कोनोशी, राणेगाव,बेलगाव १० वर्षापासून अंधारात 

गावात अक्षय प्रकाश योजना राबविण्याची जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे मागणी 

जि.प.सदस्या हर्षदाताई काकडे यांनी दिले  निवेदन 

वेब टीम नगर : गेल्या १० वर्षापासून शेवगाव तालुक्यातील मौजे चेडेचांदगाव, कोनोशी, राणेगाव व बेलगावाजवळ लाईट असून सुध्दा चारही गाव अंधारात लोटण्यात आले असून तातडीने या गावात अक्षय प्रकाश योजना सुरू करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली. या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे यांनी स्थानिक ग्रामस्थांसह जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी रमेश माने, रमेश गोंधळी, शिवाजी कणसे, बाबासाहेब गोंधळी, बाळासाहेब कणसे, परमेश्‍वर गोंधळी, काकासाहेब गोंधळी, भारत गोंधळी सुनील आव्हाड आदी उपस्थित होते.

             शेवगाव तालुक्यातील मौजे चेडेचांदगाव, कोनोशी, राणेगाव व बेलगाव येथील वाडीवस्तीवर अनेक कुटुंब राहतात. त्यांना अक्षय प्रकाश योजनेचा लाभ मिळावा म्हणून नागरिकांनी वेळोवेळी शेवगाव महावितरण कार्यालयास पत्र व्यवहार केलेला आहे. तसा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ शेवगाव कार्यालयाकडून अहमदनगर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या मुख्य कार्यालयाला दिलेला आहे. परंतु त्यावर अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.सदर ठिकाणी लाईट नसल्यामुळे नागरिकांना अंधारातच राहावे लागत आहे. त्यांच्या शाळकरी मुलांना रात्री अभ्यास करता येत नाही. घरात टीव्ही वगैरे कोणती वस्तू वापरता येत नाही. साधा मोबाईल चार्ज करण्यासाठी दीड ते दोन कि.मी. अंतरावर असलेल्या मुख्य गावात जावे लागते. अशा अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. 

सदरच्या गावाजवळ लाईट येऊन सुद्धा वस्त्या अजूनही अंधारातच आहे. सदर ग्रामस्थांवर महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ विभागाकडून गेल्या दहा  वर्षापासून अन्याय होत आहे. लेखी निवेदन देऊन नागरिक हैराण झाले असून, पत्रव्यवहार करून सदरच्या गावातील नागरिक दमले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. शेवगाव तालुक्यातील मौजे चेडेचांदगाव, कोनोशी, राणेगाव व बेलगावात अक्षय प्रकाश योजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. 

Post a Comment

0 Comments