अखेर राज ठाकरे ,चंद्रकांत पाटील यांची भेट झाली
नवे समीकरण निर्माण होण्याची प्रतिक्षा
वेब टीम नाशिक : राज ठाकरे हा अश्वासक चेहरा आहे, मात्र ते जोपर्यंत परप्रांतियांचा मुद्दा सोडत नाहीत तोपर्यंत पुढं जाता येत नाही असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. राज यांच्यांबरोबर हवा-पाण्याच्या गप्पांसह परप्रांतियांच्या मुद्यांवर चर्चा झाली, मी त्यांची परप्रांतियांच्या बाबतची भूमिका समजवून घेणार असून राज ठाकरे आपल्याला त्यांच्या भाषणाची लिंक पाठवणार आहेत असंही चंद्रकात पाटलांनी सांगितलं.
नाशिक दौऱ्यावर आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यांत आज सकाळी १० ते १५ मिनीटे भेट झाली. दोन्ही नेते तीन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये दाखल झाले होते. दोघांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहातच होता. त्यामुळे शुक्रवार पासूनच या दोघांच्या भेटीची शक्यता व्यक्त होत होती. अखेर रविवारी सकाळी उभयतांमध्ये भेट झाली.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की,"राज्यातील सर्व साखर कारखाने धोक्यात आहेत. आजवर केंद्रानं अनेक पॅकेज दिले पण त्याचा काही फायदा करुन घेतला नाही. केंद्र सरकार देशातील सहकार समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे."
इंधन दरावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, "इंधनावर केंद्र सरकार कर घेते, त्यात सर्व प्रोसेस असतात. राज्याला ते खर्च नसतात, मिळणारं कर उत्पन्न हे पूर्ण उत्पन्न असतं. इंधनाच्या दरात राज्यानं १० रुपये कमी करावे अशी मी केंद्राकडे मागणी करतो."
मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला एसटी बसनं जावं ही भाजपच्या अध्यात्मिक आघाडीची मागणी आहे, ती वारकऱ्यांची भावना आहे. ती शब्दशः कोणी घेऊ नये असंही चंद्रकात पाटील म्हणाले.
मनसे आणि भाजप यांची नाशिक महापालिकामध्ये २०१२ते २०१७ या पंचवार्षिक काळात सत्ता होती. यानंतर भाजपने बहुमताचा आकडा गाठला तर मनसेची सदस्य संख्या ४० वरून ५ वर आली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यानं मनपा निवडणुकीत भाजपला तिन्ही पक्षांकडून लक्ष्य केले जाणार आहे. त्यामुळे आहे ती सत्ता राखण्यासाठी भाजप आणि गेलेली सत्ता पुनः प्राप्त करण्यासाठी मनसे कामाला लागली आहे.
दोन्ही नेत्यांनी नाशिकमधील आपापल्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन वन टू वन चर्चा करुन सध्याच्या स्थितीचा आढावा घेतला. दोन्ही पक्षांना मनपा निवडणुकीत एकमेकांची गरज लागण्याची शक्यता कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे राज आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीला महत्व प्राप्त झालंय. चंद्रकांत पाटील यांनी आपली भेट अनौपचारिक होती, जुनी मैत्री आहे असे सांगत चर्चेचा तपशील सांगितला नसला तरी नव्या समिकरणांची पायाभरणी म्हणून या भेटीकडे बघितले जात आहे. जुनी मैत्री मनपा निवडणुकीच्या राजकारणातही दिसणार का, येत्या काळात काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून तीन मोठे पक्ष एकत्र आल्यानंतर भाजपला कोणताही प्रबळ मित्रपक्ष राहिला नाही. मनसे भाजपसोबतच्या युतीसाठी पर्याय ठरु शकतो पण राज ठाकरेंची परप्रांतियांविषयीची भूमिका भाजपला मान्य नाही. त्यावरुन या दोन पक्षांतील युतीचं घोडं अडलं आहे.
0 Comments