आधी गोळ्या घातल्या; भारतीय असल्याचं समजताच दानिशच्या डोक्यावरून…
वेब टीम काबूल : अमेरिकन सैन्यानं परतीचा रस्ता धरल्यानंतर अफगाणिस्तानात तालिबाननं पुन्हा एकदा हैदोस घातला आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांसोबत संघर्ष उफाळून आला असून, या संघर्ष टिपण्यासाठी गेलेल्या भारतीय फोटोग्राफर दानिश सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. अफगाण लष्कर आणि तालिबान्यांमध्ये झालेल्या संघर्षावेळी दानिश यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, दानिश यांच्या मृत्यू्बद्दल खळबळजनक माहिती समोर आली आहे. अंगावर शहारे आणणारं क्रौर्य तालिबान्यांनी दानिश सिद्दीकीसोबत केल्याचा घटनाक्रम समोर आला आहे.
रॉयटर्स वृत्तसंस्थेसाठी फोटोग्राफी करणारे दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानात उफाळून आलेला संघर्ष टिपण्यासाठी गेले होते. या संघर्षादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूबद्दल इंडिया टुडे वृत्तवाहिनीने अफगाणिस्तानच्या लष्करातील कमांडरच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. अफगाण लष्करात कमांडर असलेल्या बिलाल अहमद यांनी दानिश सिद्दीकीसोबत तालिबान्यांनी केलेल्या क्रूर कृत्याची कहाणी सांगितली. तालिबानी दहशतवाद्यांनी दानिशला फक्त गोळ्याच घातल्या नाही, तर त्यांच्या डोक्यावरून गाडीही चालवली, असं त्यांनी म्हटलं आहे.
“तालिबानी घुसखोरांनी दानिश सिद्दीकीचा अनादर केला. तालिबानी भारतीयांचा तिरस्कार करतात. त्यामुळेच त्याच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली”, असं बिलाल अहमद म्हणाले. “पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या स्पिन बोल्डक शहराच्या परिसरात तालिबानी आणि अफगाण लष्कराची चकमक झाली. यावेळी तालिबान्यांनी लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह दानिशलाही गोळ्या घातल्या. दानिश भारतीय नागरिक असल्याचं जेव्हा तालिबान घुसखोरांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी दानिशच्या डोक्यावरून गाडी घातली. दानिश मेलेला आहे, हे माहिती असतानाही त्यांनी हे कृत्य केलं”, कमांडर बिलाल अहमद यांनी सांगितलं.
दानिश सिद्दीकीचा मृत्यू झाल्यानंतर तालिबानने भूमिका स्पष्ट केली होती. तालिबानचे प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद यांनी दानिशच्या मृत्यूसंदर्भात ‘सीएनएन न्यूज १८’शी बोलताना माहिती दिली होती. दानिश सिद्दीकीच्या मृत्यूला आम्ही जबाबदार नाही; पण तो या भागात असल्याची कल्पना आम्हाला देण्यात आली नव्हती. नक्की कोणत्या गोळीबारात भारतीय पत्रकाराचा मृत्यू झाला याची आम्हाला माहिती नाही. दानिश सिद्दीकीचा मृत्यू कसा झाला हे आम्हाला माहिती नाही,” असं मुजाहिद म्हणाले होते. “युद्ध सुरु असणाऱ्या प्रदेशामध्ये एखादा पत्रकार येत असेल, तर त्यासंदर्भातील माहिती आम्हाला दिली पाहिजे. त्या व्यक्तीला काही होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ,” असंही मुजाहिद म्हणाले होते.
0 Comments