युवतीला पळवून नेल्याच्या रागातून प्रियकरासह दोघांचा खून

युवतीला पळवून नेल्याच्या रागातून प्रियकरासह दोघांचा खून

वेब टीम पुणे : युवतीला पळवून नेल्याच्या रागातून प्रियकरासह दोघांचा काठ्या व लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून खून केल्याचा खळबळजनक प्रकार खेड तालुक्यातील करंजविहिरे गावात घडला. या प्रकरणी नऊ जणांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे.

बाळू सिताराम गावडे (वय २६), राहुल दत्तात्रय गावडे (२८, दोघे रा. आसखेड खुर्द, ता. खेड, जि. पुणे) अशी खून झालेल्या कामगारांची नावे आहेत. वीटभट्टी मालक आणि त्याच्या आठ साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यात मयत बाळू गावडे याच्या पत्नीचाही समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात करंजविहिरे गावात हॉटेल 'माणुसकी'समोर मालक बाळू मरगज यांची वीटभट्टी आहे. या ठिकाणी बाळू आणि राहुल गावडे कामाला होते. यापैकी बाळू विवाहित होता. त्याला दोन अपत्येही आहेत. वीटभट्टी मालकाच्या २१ वर्षीय मुलीच्या तो प्रेमात पडला. त्याने तिच्यासमवेत पळून जाण्याचा निर्णय घेतला.

बाळूने युवतीसह १५ जुलैला पळून जाण्याचे ठरविले. त्यासाठी राहुलची मदत घेतली. राहुलने दोघांना खोपोलीला सोडले. तरुणी पळून गेल्याचे तिच्या नातेवाइकांना समजताच शोध सुरू झाला. यात राहुलही होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर दोन दिवसांनी बाळू आणि राहुल या दोघांनाही हॉटेलमध्ये आणण्यात आले. लाकडी काठी आणि लोखंडी रॉडने दोघांना बेदम मारहाण केली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर युवतीच्या नातेवाइकांनी घटनास्थळावरून पळ काढला.

मारहाण केल्यानंतर युवतीच्या नातेवाइकांपैकीच एकाने थेट पोलिसांना फोन करून हॉटेलमध्ये दोन मृतदेह असल्याची माहिती दिली. मात्र, पोलिसांना मृतदेह संशयास्पद वाटल्याने माहिती देणाऱ्या आरोपीकडे चौकशी केली. त्यात या दुहेरी खुनाचा उलगडा झाला. या प्रकरणी मरगज यांच्यासह नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू आहे.

Post a Comment

0 Comments