दिलीप कुमार यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा ; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
वेब टीम मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याआधी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र बुधवारी पहाटे त्यांचं निधन झालं.
दिलीप कुमार यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधून शोक व्यक्त केला जातोय. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने दिलीप कुमार यांना ६ जूनला रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. त्यांच्या फुप्फुसात पाणी भरल्यानं त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या फुप्फासातील पाणी काढल्यानंतर त्यांची ऑक्सिजन पातळी देखील वाढू लागली होती. प्रकृतीत सुधारणा पाहून अभिनेते दिलीप कुमार यांना ११ जून रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता.
मात्र पुन्हा एकदा दिलीप कुमार यांना पुन्हा श्वास घेण्यासाठी अडचण येत असल्यानं ३० जूनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी होती. अखेर बुधवार ७ जुलैला पहाटे दिलीप कुमार यांची प्राणज्योत मालवली.
संध्याकाळी ४.३० वाजता दिलीप कुमार यांच्यावर सांताक्रुझ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी दिलीप साहेबांना शेवटचा निरोप दिला.
0 Comments