माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमसह ४० जणांवर गुन्हा

माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमसह ४० जणांवर गुन्हा

टपरीचालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप

वेब टीम नगर : माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम  आणि त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम यांच्याविरुद्ध आता एका टपरीचालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. ही टपरी जेसीबीने उखडून टाकून ती जागा बळकावल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.

शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्याने छिंदम वादग्रस्त ठरला होता. तेव्हा भाजपने त्याची हकालपट्टी केली होती. या गुन्ह्यात त्याला अटक झाली, त्याचे नगरसेवक पद गेले. तो दुसऱ्यांदा निवडून आला, तेही पद रद्द करण्यात आले आहे. त्याच्या मूळ गुन्ह्याचा निकाल अद्याप प्रलंबित आहे.

आता त्याच्यासह त्याचा भाऊ आणि तीस ते चाळीस जणांविरुद्ध दिल्लीगेट येथील एका टपरीचालकाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीगेट येथे ज्युसचे दुकान चालविणारे भागीरथ भानुदास बोडखे (वय ५२ रा. नालेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीपाद शंकर छिंदम, श्रीकांत शंकर छिंदम, महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे (सर्व रा. तोफखाना) व इतर ३० ते ४० अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, ९ जुलै रोजी दुपारी हे सर्व आरोपी दिल्लीगेट येथे आले. भागीरथ बोडखे त्यांच्या ज्यूस सेंटरमध्ये काम करत होते. श्रीकांत व श्रीपाद छिंदम यांच्यासह जमावाने जेसीबी व क्रेन घेऊन तेथे आले होते. त्यांनी बोडखे यांना शिवीगाळ केली. ज्यूस सेंटरमधील सामानांची फेकाफेक केली. बोडखे यांनी त्यांचा मुलगा प्रतीक व पत्नी कविताला बोलून घेतले. यावेळी श्रीपाद याने ही जागा आपण घेतली असून ती माझ्या ताब्यात दे, असे म्हणून सामानाची फेकाफेक सुरू केली. धमकी दिली आणि जातीवाचक शिवीगाळही केली. त्याच्यासोबतच्या इतरांनीही बोडखे कुटुंबांना शिवीगाळ केली. आरोपींनी टपरीमधील सामान फेकून देत गल्ल्यातील ३० हजार रुपयांची रक्कम काढून घेतली. आरोपींनी बोडखे यांची टपरी जेसीबीच्या सहाय्याने तोडून बाजूला केली व त्या ठिकाणी इतर १२ नवीन पत्र्याच्या टपर्‍या उभ्या केल्या आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात छिंदंम बंधूंसह जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments