बलात्काराच्या आरोपातील गुन्हेगाराचे बेड्यांसह पलायन

बलात्काराच्या आरोपातील गुन्हेगाराचे बेड्यांसह पलायन 

वेब टीम मुंबई : अँटिजन चाचणी करून परतत असताना बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी हातातील बेड्यांसह पसार झाल्याची घटना कांदिवलीच्या चारकोपमधून समोर आली आहे. अविनाश यादव असे पळ काढलेल्या आरोपीचे नाव असून, पोलिसांची गाडी सिग्नलवर थांबताच त्याने फिल्मीस्टाइल पलायन केले.

कांदिवली परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर २१वर्षीय अविनाश याचे प्रेम होते. मात्र मुलगी १७ वर्षांची असल्याने तिच्या घरच्यांचा यासाठी विरोध होता. तरीही दोघांच्या भेटीगाठी सुरूच होत्या आणि दोघांमध्ये शारीरिक संबंधही झाले. हे समजताच मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार केल्यावर अविनाश याच्यावर पोक्सो तसेच इतर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. चारकोप पोलिसांनी त्याला चार दिवसांपूर्वी अटकही केली. गुरुवारी सकाळी त्याला अँटिजन चाचणी करण्यासाठी नेण्यात आले होते. तिथून परतत असताना कांदिवली सिग्नलला गाडी थांबली होती. त्याचा फायदा घेत पोलिसांना धक्का देत हातातल्या बेड्यांसह अविनाशने पळ काढला. सर्व पोलिस ठाण्यांना याबाबत कळविण्यात आले आहे. अविनाश याचे वर्णन सर्वांना देण्यात आले असून त्या आधारे पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Post a Comment

0 Comments