मुंढेंना डावलणाऱ्या भाजपातील असंतुष्ट नेत्यांचा जाहीर निषेध

मुंढेंना डावलणाऱ्या भाजपातील असंतुष्ट नेत्यांचा जाहीर  निषेध 

जय भगवान बाबा महासंघाचे मुंढे भगिनींना समर्थन 

 वेब टीम नगर : प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंढे यांनी भाजपचे रोपटे राज्यात लावले.नंतरच्या काळात भाजपचा वटवृक्ष झाला. पक्षाला युतीच्या माध्यमातून राज्यात सत्ता प्राप्त झाली नंतर केंद्रातही भाजपला सत्ता मिळाली. आजही केंद्रात भाजप सत्तेत आहे.हि सगळी किमया मुंढे-महाजन यांनी घडवली असून,त्यामागे त्यांचे विशेष परिश्रम होते. समाजाचा विश्वास त्यांनी संपादित करून पक्ष तळागाळापर्यंत पोहोचविला.मात्र, आज त्यांच्या पश्चात अलीकडच्या नेतृत्वाने डॉ.प्रीतम मुंढे यांना डावलून समाजाचा विश्वासघात केला असा आरोप जय भगवान बाबा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सानप यांनी केला. 

जय भगवान बाबा महासंघाच्या वतीने आयोजित केलेल्या सभेत श्री.सानप सभेचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.यावेळी डॉ.मुंढे यांना मंत्रीपदाची संधी न  दिल्याबद्दल भाजप मधील असंतुष्ट नेत्यांचा तीव्र निषेध करण्यात आला.यावेळी श्री.सानप यांच्या समवेत महासंघाचे जिल्हाउपाध्यक्ष मदन पालवे, कैलास गर्जे,किशोर पालवे,हेमंत राख,शिवाजी पालवे (मेजर),संपर्क प्रमुख डॉ.श्रीकांत चेमटे, संजय आव्हाड,शरद मुर्तडकर, ॲड पोपट पालवे , संदीप जावळे, ऋषिकेश पालवे, देविदास गीते , रमेश पालवे , शिवाजी गर्जे आदी उपस्थित होते. 

मुंढे यांनी जनसामान्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता पक्ष संघटन मजबूत केले, त्याच बरोबर ओबीसी संघटनेचे ध्रुवीकरण केले. मुंढे यांच्या पश्चात समाजान  आणि पक्षानं पंकजा आणि प्रीतम यांच्याकडे त्यांचे उत्तराधिकारी म्हणून पहिले आणि मुंढे भगिनी यांनीही पक्षनिष्ठा जपत जनसामान्यांचा विश्वास संपादन केला.परंतु आज पक्षातील असंतुष्ठ नेत्यांनी डॉ.प्रीतम मुंढे यांना मंत्रिपदाची संधी न देता डावलल्याने जनसामान्यांमध्ये विशेषतः वंजारी समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत, त्याचे पडसाद राज्यभर उमटत असून आजची हि निषेधसभा या निमित्ताने घेण्यात आली. 

वास्तविक पाहता डॉ मुंढे यांना केंद्रात २०१९ साली सत्तेवर आल्याबरोबर मंत्रिपदाची संधी द्यायला हवी होती. मात्र त्यांना डावलण्यात आले आणि आता २०२१ ला मंत्री मंडळ विस्तारातही पुन्हा डावलण्यात आले हि अत्यंत खेदाची बाब आहे. भाजपातील मनमानी करणाऱ्या नेत्यांचा जय भगवान बाबा महासंघ जाहीर निषेध नोंदवत आहे. 

महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध नोंदवत असतांना डॉ प्रीतम मुंढे आणि पंकजा मुंढे यांनी मुंढे साहेबांचे अनुकरण करणे गरजेचे असून त्यांनी जनसामान्यांबरोबर वंजारी समाजाच्या सोबत राहावं आणि नेतृत्व करावे असे आवाहन यावेळी केले. 

यापुढील काळात समाजाचे नेतृत्व करणाऱ्या बाळासाहेब सानप यांच्यासारख्य सामाजिक नेत्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे. असे नमूद करून रमेश सानप पुढे म्हणाले मुंढे भगिनींनी देखील समाजाचं नेतृत्व करतांना बाळासाहेब सानप यांच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्याला बळ दिले पाहिजे  आणि समाजा बरोबर राहील पाहिजे. 

स्व.गोपीनाथ मुंढे यांनी अनेक सामान्य कार्यकर्त्यांना लोकसभा आणि विधान सभेत संधी उपलब्ध करून देण्याची किमया केली. आज भागवत कराडांना मंत्रीपद दिले याचा समाजाला आनंद जरी असला तरी, प्रीतम मुंढे यांना मंत्रिपद देण्याची आवश्यकता होती. भाजपच्या काही मी म्हणणाऱ्या नेत्याची कूटनीती आमच्या समाजात दुफळी माजवणारी आहे.मात्र वंजारी समाज कालही  एकसंघ होता, आजही आणि उद्याही एकच असणार आहे असा ठाम विश्वास सानप यांनी व्यक्त केला.

सभेत डॉ. श्रीकांत चेमटे, संजय आव्हाड ,कैलास गर्जे आदींची समयोचित भाषणे झाली. सभेनंतर सर्व कार्यकर्त्यांनी भाजपच्या विरोधात घोषणा दिल्या.

Post a Comment

0 Comments