रेल्वेगाडीत चोरी करणाऱ्या महिला लुटारूंच्या टोळी गजाआड

रेल्वेगाडीत चोरी करणाऱ्या महिला लुटारूंच्या टोळी गजाआड 

वेब टीम नागपूर : गोंदिया-इतवारी मेमूत या महिलांनी अनेक प्रवाशांचे सामान लुटले. गाडी इतवारीला आल्यानंतर रेल्वे स्टेशनवरून निघून न जाता त्या स्टेशन परिसरात थांबून राहिल्या. ही गाडी गोंदियाला परत जाताना पुन्हा एकदा चोरी करण्याचा त्यांचा विचार होता. त्यापूर्वीच संशयाच्या आधारे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असता खरा प्रकार उघड झाला.

राणू गायकवाड (३०), स्वाती शेंडे (३२), गिरिजा खडसे (३०) आणि भारती पात्रे (३३, सर्व रा. पारशिवनी) अशी अटकेतील महिलांची नावे आहेत. रेल्वेस्थानकाजवळ फेकलेल्या प्रवाशांच्या पर्स आणि संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या महिलांविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली. संगीता वर्मा (३३), संतोषी मांडले (२९, दोन्ही रा. डोंगरगड) आणि शेख अमजद शेख मेहबूब (२७, रा. नागपूर) अशी फिर्यादींची नावे आहेत. हे तिघेही गोंदिया-इतवारी मेमूने प्रवास करीत होते. कामठी ते कळमना प्रवासादरम्यान महिला टोळीने त्यांच्या पर्स लंपास केल्या. तिघांच्याही पर्समध्ये रोख रक्कम, एटीएम आणि महत्त्वाची कागदपत्रे होती.

तक्रार मिळताच सहायक पोलिस निरीक्षक मुबारक शेख यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक वरठे, किरण भोयर, दीप्ती बेंडे, पोहवा विजय सुरवाडे, श्रीधर पेंदोर, वासनिक, भिवगडे यांच्या पथकाने कळमना रेल्वेस्थानक गाठले. यावेळी आरपीएफ आरक्षक बी. लॅम्बो, आरपीएफ जवान विवेक कनोजिया आणि पासवान हे पेट्रोलिंगवर होते. त्यांच्या मदतीने स्टेशन परिसरात शोध घेतला असता आउटरवर चार महिला थांबल्याचे आढळले. चौकशी केली असता गोंदियाला जायचे असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. स्टेशनवर गाडीची वाट बघण्यापेक्षा त्या आउटरवर का थांबल्या, यावरून पोलिसांचा संशय बळावला. त्यांची सखोल चौकशी केली असता चोरीची कबुली मिळाली. पैसे काढून पर्स आउटरवर फेकल्याचेही त्यांनी सांगितले. लगेच पोलिसांनी आरोपींना सोबत घेऊन झुडपात शोध घेतला. पर्स आणि मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

Post a Comment

0 Comments