'अश्लिल व्हिडीओ स्कॅम 'च्या आमिषाला बळी पडू नका

'अश्लिल व्हिडीओ स्कॅम 'च्या आमिषाला बळी पडू नका  

वेब टीम कर्जत :  सोशल मिडियाच्या फेसबुक अकाऊंटवरून तुम्हाला अनोळखी मुलीच्या नावाची फ्रेंड रिक्वेस्ट येते. ती फ्रेंड रिक्वेस्ट माहिती न घेता ऍक्सेप्ट केली जाते.चॅटिंग बरोबरच व्हिडीओ कॉल,व्हाट्सअप कॉल करण्यास सुरुवात होते. समोरची व्यक्ती अंगावरील कपडे काढुन अंगप्रदर्शन करत अश्लील हावभाव करते.समोरच्या व्यक्तीला मोहात अडकवले जाते. बेभान झालेल्या युवकाकडूनही कपडे काढण्याची विनंती केली जाते. त्याला प्रोत्साहन देत त्याच्याकडून विवस्त्र अश्लील बाबी करवून घेतल्या जातात विशेष म्हणजे या सर्व प्रकाराचे व्हिडीओ ऑन स्क्रीन रेकॉर्ड केले  जाते.त्यानंतर काही दिवसांच्या फरकाने तुम्हाला मॅसेज, फोनकॉल करून पैशांची मागणी केली जाते अन्यथा तुमचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली जाते. अशी बाब कुणाच्यासोबत घडत असेल तर सावधान! कारण आर्थिक फसवणुकीसाठी सुरू असलेला हा ट्रेंड असुन युवकांनो 'अश्लील व्हिडीओ स्कॅमच्या' आमिषाला कुणीही बळी पडू नका असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.

 सध्या या अश्लील व्हिडीओ कॉल स्कॅमचे अनेक युवक बळी पडताना दिसत आहेत.कर्जत तालुक्यातील युवकांना पैसे द्या नाहीतर व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमक्या आल्या. युवकांनी पैसे देऊनही त्यांना पुन्हा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत कर्जतच्या पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या आहेत.साहेब तक्रार घ्या, गुन्हा दाखल करू नका परंतु यावर मार्ग काढा अशी आर्जव तरुण करत आहेत. आजची तरुणाई सोशल मिडियाची मोठी फॅन बनली आहे.तरुणाईने जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत 'इंटरनेट' व 'मोबाईल' नेऊन ठेवला असल्याची सद्यस्थिती आहे. मात्र याचा वापर समाजहिताच्या गोष्टी जोपासण्यासाठी झाला तर उत्तमच नाहीतर हातून झालेली एक चुक जिवावरही बेतू शकते.जेंव्हा एखादा तरुण अशा अश्लील चक्रव्यूहात फसतो तेंव्हा त्याला समाजात होणाऱ्या बदनामीची भीती वाटते. आत्महत्येसारखे विचार त्याच्या मनात येतात.आपली फसवणूक झाली असेल आर्थिक मागणी होत असेल तर पोलीस यंत्रणेशी संपर्क साधणे गरजेचे आहे.सायबर सेलचे अनेक गुन्हे आता डोके वर काढत असुन प्रत्येकाने सावधगिरी बाळगून सोशल मिडियाचा वापर करावा असे आवाहनही पोलीस निरीक्षक यादव यांनी केले आहे.

युवकांनो अश्लील जाळ्यात फसू नका

  आर्थिक फसवणुक करण्यासाठी सराईत मुलांकडून मुलींच्या नावाचा व फोटोंचा वापर करून अश्लील जाळ्यात ओढले जाते.कुणाचीही अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारू नका.आपली फ्रेंड लिस्ट आणि फॉलोवर्स वाढवण्याचा अट्टाहास आपले आर्थिक व मानसिक नुकसान करू शकते.याबाबत काळजी घ्या,मित्रांनाही सांगा.असे कोणतेही प्रकार घडल्यास वेगळे पाऊल न उचलता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा.

       -चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक कर्जत

Post a Comment

0 Comments