लसीकरणा आधी पेनकिलर न घेण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

लसीकरणा आधी पेनकिलर न घेण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा 

वेब टीम जिनिव्हा: करोना लस घेतल्यानंतर होणारी वेदना दूर करण्यासाठी लसीकरणाआधीच पेनकिलर न घेण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. लस घेण्याआधीच पेनकिलर्स औषधे घेतल्याने लशीची परिणामकता कमी होऊ शकते असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. मात्र, करोना लस घेतल्यानंतर पेनकिलर औषधे घेतल्यास लशीच्या प्रभावावर परिणाम होणार नसल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

करोना लसीकरणानंतर अनेकांना हाताला वेदना जाणवतात. त्याशिवाय डोकेदुखी, अंगदुखी, ताप आदी लक्षणे दिसून येतात. अशावेळी पेनकिलर अथवा पॅरासिटोमॉल औषधे घेण्यास काही हरकत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी म्हटले.

करोना लसीकरणाबाबत दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

करोना लस घेण्याआधी पेनकिलर्स, पॅरासिटेमॉलसारखी औषधे घेण्याची शिफारस करण्यात आली नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. लस घेण्याआधीच ही औषधे घेतल्यास लशीच्या प्रभावावर कितपत परिणाम होतो, हे अद्याप सांगता येत नसले तरी त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता अधिक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

दरम्यान, फायझर आणि अॅस्ट्राझेनेका या कंपन्यांच्या करोनाप्रतिबंधक लशीची एक मात्रा ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना करोना संसर्गापासून ६० टक्के संरक्षण देते, असे एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या दोन संशोधकांनी हा अभ्यास केला. त्यांचा हे संशोधन अभ्यास 'द लॅन्सेट इन्फेक्शस डिसीजेस'मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. या संशोधनात ६५ व त्यावरील वयाच्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता.

करोनाच्या डेल्टा या नव्या प्रकारामुळे ब्रिटनमध्ये सध्या चिंता व्यक्त होत आहे. या डेल्टाचा संसर्ग सुरू होण्यापूर्वीचा हा अहवाल आहे. या कंपन्यांची पहिली लस घेतलेल्या इंग्लंडच्या विविध शहरांतील ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या १०,४१२ नागरिकांना या सर्वेक्षणात सहभागी करून घेण्यात आले होते. यातील सर्वाधिक वयाची व्यक्ती ही ८६ वर्षांची होती. तसेच, या सहभागींमध्ये ७० टक्के महिला होत्या. गेल्या वर्षी जूनपासून हे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. यामध्ये करोनाचे संक्रमण, संसर्ग, लसीकरण व त्यानंतरची स्थिती याचा अभ्यास करण्यात आला.

Post a Comment

0 Comments