महाराष्ट्रात आज लसीकरणाचा उच्चांक, एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार नागरिकांना दिली लस

महाराष्ट्रात आज लसीकरणाचा उच्चांक, एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार नागरिकांना दिली लस

वेब टीम मुंबई : राज्यात आजपासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली. राज्यात आज एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार ९०९ जणांना लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविण्यात आला आहे. आरोग्य यंत्रणेच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी समाधान व्यक्त करतानाच त्यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशात अग्रेसर असून हे सातत्य टिकवत आतापर्यंत सुमारे २ कोटी ८५ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. आज दिवसभरात ५ लाख ५२ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. रात्री ८ वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून त्यात अजून वाढ होऊ शकते, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. यापूर्वी २६ एप्रिल रोजी एकाच दिवशी ५ लाख ३४ हजार नागरिकांना लस देण्यात आली होती, असेही डॉ. व्यास यांनी सांगितले.

मुंबईत लसीकरण वेगाने

मुंबईत लसीकरणावर देखील जोर दिला जात आहे. लसीकरणाबाबत महत्वाची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत सध्या लसपुरवठा चांगला आहे. जून महिन्यात जवळपास ६  लाखांपेक्षा अधिक लसपुरवठा झाला आहे. प्रत्येक सेंटरवर ३००लसी दिल्या जात आहेत, असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, मुंबईत गर्दीचं नियोजन करता यावं याकरता १८ ते ४४ वयोगटामध्ये दोन उपगट करण्यात आलेत. यांपैकी राज्याच्या संमतीनं ३० ते ४४ च्या वयोगटाचं लसीकरण सुरु झालं आहे. मुंबईत १८ ते ४४ वयोगटात ५० लाख लोकसंख्या आहे. पुढचा एक आठवडा २ उपगटांनुसार लसीकरण प्रक्रीयेचा अभ्यास करणार आहोत. पुढच्या आठवड्यात पुन्हा नवं नियोजन करणार आहोत, असं ककाणी यांनी सांगितलं. 

काकाणी यांनी सांगितलं की, गेल्या ३ महिन्यांत एप्रिल- ८ लाख ७०हजार, मे-  ४ लाख ५७ हजार,  जून- आतापर्यंत ६ लाखांपेक्षा जास्त मुंबईला लसपुरवठा झाला आहे. ७५  टक्के   लससाठ्यावर केंद्राचं नियंत्रण आहे. ज्याकडून मुंबई महापालिकेला लस साठा मिळतो. लस  साठा वाढल्यास अधिक लस केंद्र सुरु करण्याचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments