सरकारी नोकरी लावून देतो असे सांगून साडे अठरा लाख रुपयांना गंडा घातला

सरकारी नोकरी लावून देतो असे सांगून साडे अठरा लाख रुपयांना गंडा घातला 

वेब टीम नगर : माझी मंत्रालयात व मंत्र्यांशी मोठ्या प्रमाणात ओळख आहे, तुला महसूल विभागातील आरक्षित कोट्यातून नोकरी लावून देतो, त्यासाठी पैसे द्यावे लागतील, असे सांगून तब्बल १८ लाख ४७ हजार ७०० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. वरून पैसे परत मागितले असता शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी, नितीन गंगाधर जोंधळे (रा. कोकणगाव, ता. संगमनेर), विजयकुमार श्रीपती पाटील (रा. ललित बिल्डिंग, नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे) या आरोपींविरूद्ध अकोले पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अकोले पोलीस स्टेशनला शेखर नंदू वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे. यात म्हटले आहे, की माझ्या नातेवाईकांच्या मित्राच्या ओळखीने ओळख झालेले नितीन गंगाधर जोंधळे, विजयकुमार श्रीपती पाटील यांनी मला वेळोवेळी माझी मंत्रालयात व मंत्र्यांशी ओळख आहे, मी अनेकांना शासकीय नोकरीला लावलेले आहे. तुम्ही पैसे द्या तुम्हालाही महसूल विभागाच्या आरक्षित कोट्यातून नोकरीला लावून देतो. पैसे दिले तर तुम्हाला तलाठी पदावर नियुक्ती करून देतो, असे वारंवार सांगितले. नितीन जोंधळे याने पैशाची हमी घेतली व विजयकुमार पाटील याने अनेकांना नोकरीला लावल्याच्या ऑर्डर्स दाखवल्याने विश्वास प्राप्त झाला, व दि.३ जुलै २०२० रोजी ते दि.१५ मार्च २०२१ पर्यंत या दोघांना १४ लाख ४५ हजार रुपये रोख व ऑनलाइन रक्कम ४ लाख २ हजार ७०० रुपये असे एकूण १८ लाख ४७ हजार ७०० रुपये दिले; मात्र पैसे देऊनही कोणत्याही प्रकारची नियुक्ती मिळाली नाही. दोघांनी फसवणूक केल्याने जोंधळे याच्याकडे पैशाची मागणी केली, त्याचा राग येऊन जोंधळे याने शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. 

Post a Comment

0 Comments