मोलकरणीने दाखवली ५० उच्चभ्रू कुटुंबियांना 'हाथ कि सफाई'
वेब टीम मुंबई : घरकामाच्या बहाण्याने लुटीचा धंदा तिने सुरू केला होता. मोलकरीण म्हणून उच्चभ्रू घरांमध्ये कामाला राहायचे आणि संधी मिळताच घर 'साफ' करून पसार व्हायचे... मुंबईतील ५०हून अधिक घरांमधून पैसे, सोन्या-चांदीचे दागिने, मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या वनिता गायकवाड हिला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. विशेष म्हणजे प्रत्येक चोरीनंतर वनिता आपले राहते घर बदलत असल्याने ती पोलिसांच्या हाती लागत नव्हती.
विलेपार्ले येथील गुलमोहर रोडवरील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या कुटुंबाच्या घरी २५ मे रोजी चोरी झाली. घरातील दहा हजार रुपये आणि २५०० डॉलर चोरण्यात आले होते. या घटनेनंतर मोलकरीण उषा ही कामावर येत नसल्याने या कुटुंबाचा तिच्यावरच संशय होता. त्यानुसार तिच्याविरोधात त्यांनी जुहू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. उषा हिने कामाला लागताना कोणतेच कागदपत्र, ओळखपत्र न दिल्याने या कुटुंबाला तिचे पूर्ण नाव, पत्ता याबाबत काहीच कल्पना नव्हती. मालमत्ता कक्षाचे प्रभारी पोलिस निरीक्षक शशिकांत पवार यांच्या पथकाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला. विलेपार्ले परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करीत असताना उषा हिचा चेहरा दिसला आणि ती रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निदर्शनास आले. तिचे नाव उषा नसून, वनिता असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले.
मुंबईतील अनेकांना घरामध्ये चोरी करणारी ही महिला चेंबूर परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. या त्रोटक माहितीवरून पोलिसांच्या पथकाने मानखुर्द, वाशी नाका, चेंबूर, शिवाजीनगर, देवनार हा परिसर सलग पाच दिवस पिंजून काढला. या शोधमोहिमेनंतर त्याला शोधण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी वनिता गायकवाड हिला पकडून जुहू पोलिसांच्या ताब्यात दिले.
गुजरातमध्येही गुन्हा
वनिता ही सन २००३पासून मोलकरीण म्हणून कामाला राहून चोरी करत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत मुंबईत तिच्यावर ५०हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. वनिता, सुनीता, संगीता, उषा अशी प्रत्येकवेळी नवीन नावाने ती कामाला लागत असे. गुजरातमध्ये जाऊनही तिने अशाप्रकारचे गुन्हे केल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे.
0 Comments