क्राईम पेट्रोलच्या दोन अभिनेत्रीनां चोरीच्या आरोपाखाली अटक
वेब टीम मुंबई : छोट्या पडद्यावरील गाजलेल्या मालिका 'क्राइम पेट्रोल' आणि 'सावधान इंडिया' यांमध्ये अभिनय करणाऱ्या दोन अभिनेत्रींना मुंबईत अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर राहत्या घरात चोरी केल्याचा आरोप आहे. या दोन्ही अभिनेत्री एका इमारतीमध्ये भाड्याने राहत होत्या. आपल्या सोबत राहणाऱ्या एका मुलीचं सामान चोरल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन्ही मुलींना चोरीच्या सामानासहित अटक केली आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असून न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये राहणारी २५ वर्षीय सुरभी श्रीवास्तव टीव्ही मालिकांमध्ये काम करत होती. तिच्यासोबत १९ वर्षीय मोहसिना शेखही मालिकांमध्ये काम करून तिचा निर्वाह करत होती. काही महिन्यांपूर्वी त्या दोघीही एका मैत्रिणीच्या घरी राहण्यासाठी गेल्या. आरे कॉलनी येथील पॉश परिसरात भाड्याने राहणाऱ्या या दोघींनी त्यांच्यासोबत राहणाऱ्या मुलींचं सामान चोरायला सुरुवात केली. दोघींनी मिळून इतर मुलींचं काही सामान आणि तीन लाख रुपयांपेक्षाही जास्तीची रक्कम चोरी केली.
सोबत राहणाऱ्या मुलींनी त्यांचं सामान चोरी झाल्याचं सांगून दोन्ही आरोपी मुलींवर संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासले. त्यात दोन्ही आरोपी मुली चोरी करताना आढळून आल्या. गेल्या वर्षी लागलेल्या लॉकडाउननंतर काहीही काम मिळत नसल्याने आपण चोरी केल्याचं मुलींनी कबूल केलं. चित्रीकरण बंद झाल्याने आणि काम नसल्याने त्यांना पैश्यांची अडचण निर्माण झाली होती. दोघीही अत्यंत बिकट परिस्थितीत दिवस काढत होत्या. त्यामुळे त्यांना चोरी करावी लागली, असं दोन्ही आरोपी मुलींनी स्पष्ट केलं. दोघींनी अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे.
0 Comments