पोषण आहार वाटपात अनागोंदी...

पोषण आहार वाटपात अनागोंदी... 

मेस्टाचे जिल्हाध्यक्ष प्रा. देविदास गोडसे यांचा आरोप...

वेब टीम नगर : महिला व बाल कल्याण विभागाच्या मार्फत अंगणवाड्यांतील ३ ते ६ वयोगटाच्या  बालकांना शासनामार्फत पुरक पोषण आहार दिला जातो. परंतु हा आहार त्या बालकांपर्यंत खरच पोहोचतो का हे पहाणे महत्वाचे ठरेल, असे मत मेस्टाचे जिल्हाध्यक्ष  प्रा. देविदास गोडसे यांनी व्यक्त केले आहे.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात प्रा. गोडसे यांनी म्हटले आहे की, नगर जिल्हयात ४०० इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. त्यांना पूर्व प्राथमिकचे वर्ग जोडलेले आहेत या वर्गांत ३ ते ६ वयोगटातील १० ते १५ हजार बालके दरवर्षी प्रवेशित होतात. परंतु या बालकांना  त्यांचा हक्काचा पुरक पोषण आहार मिळत नाही. परिणामी ही बालके कुपोषित राहत आहेत.

ही बालके बालके ज्या स्थानिक अंगनवाडीच्या परिसरातून येतात, तेथील अंगनवाडीतील पटावर ती नोंदलेली असतात व इंग्रजी माध्यमाच्या  शाळेच्या पटावर देखिल नोंदलेली असतात. इंग्रजी माध्यम शाळेत हजर असणारी बालके त्याच दिवशी बालवाडीच्या पटावर देखिल बोगसपणे हजर दाखवून त्यांच्या वाटयाचा सकस आहाराचा कच्चा माल उचलला जातो की काय हे आहार वाटप यंत्रणेने  शोधले पाहिजे, अशी मागणी गोडसे यांनी केली आहे.

नवीन राष्ट्रिय शैक्षणिक धोरणामुळे ३ ते ६ वयोगट हा शिक्षण हक्क कायद्याच्या कक्षेत आला आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यम शाळेत प्रवेशित ३ ते ६ वयोगटातील बालकांना या शाळेलगत असणाऱ्या अंगणवाडीच्या पटावर घेऊन त्या अंगणवाडी मार्फत  बालकांना आहार पोहोच देण्यात यावा, अशी मागणी गोडसे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments