फेसबुक वर ओळख वाढवून घातला ४३ लाखाचा गंडा
वेब टीम पुणे : 'फेसबुक'च्या माध्यमातून ओळख वाढवून सायबर चोरट्याने एका महिलेची ४३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्ली येथे कस्टम विभागात अडकलेले पार्सल सोडविण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून ही फसवणूक करण्यात आली आहे.
या प्रकरणी बिबवेवाडी येथील ३८ वर्षीय महिलेने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून फेसबुक अकाउंटधारक स्टीफन बेनजा आणि मोबाइलधारक, बँकेच्या खातेधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला दोन जूनला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. त्यानंतर त्याने ओळख वाढवून महिलेला मोबाइल क्रमांक दिला. विश्वास संपादित करून मुलीसाठी पाठविलेले गिफ्ट दिल्ली इंटरनॅशनल कस्टम ऑफिसमध्ये आल्याचे सांगितले. त्यासाठी आवश्यक शुल्क भरावे लागणार असल्याने, तोपर्यंत ते पार्सल तेथेच राहील, असे आरोपीने सांगितले. ते सोडविण्यासाठी आरोपीने महिलेला गळ घातली. आरोपीने वेगवेगळी कारणे सांगून वारंवार वेगवेगळ्या बँकेच्या खात्यांत पैसे पाठविण्यास सांगून ४३ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलिस तपास करीत आहेत.
0 Comments