बदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका

बदनामीच्या भीतीने रेखा जरे यांची हत्या झाल्याचा ठपका 

पारनेर न्यायालयात ४५० पानी दोषारोपपत्र दाखल 

वेब टीम नगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. बोठेचे जरे यांच्यासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमप्रकरणा आडून रेखा जरे आपली  बदनामी करतील या  भीतीने बोठे याने हा खून घडवून आणल्याचे दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणातील एक दोषारोपत्र पूर्वीच दाखल झालेले आहे. बोठे याला अटक झाल्यानंतर त्याच्यासह अन्य आरोपींविरुद्ध हे ४५० पानांचे पुरवणी दोषारोपत्र आज (मंगळवार) पारनेर न्यायालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली. मुख्य आरोपी बोठे याच्यासह त्याला मदत करणार्‍या अन्य सहा जणांविरुद्ध त्यात आरोप ठेवण्यात आला आहे. साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक विश्लेषणाची कागदपत्रे, घटनेसंबंधी मिळालेले पुरावे यांचाही तपशील यात आहे. बोठेचा आय फोन मात्र अद्याप प्रयोगशाळेतून तपासून आलेला नाही. त्यामुळे त्यासंबंधी हाती येणारे पुरावे नंतर सादर केले जातील, असेही पाटील यांनी सांगितले. बोठे सध्या पारनेर येथील तुरुंगातच न्यायालयीन कोठडीत आहे. दोषारोपपत्र पारनेला दाखल झाले असून नंतर ते नगरच्या जिल्हा न्यायालयात पाठविले जाऊन तिथेच त्यावर पुढील सुनावणी होणार आहे.

रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर २०२० रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीलाच पाच आरोपींना अटक केली होती. अटक केलेल्या आरोपींकडून हत्याकांडामागे मुख्य सूत्रधार बोठे असल्याची माहिती समोर आली. हत्या झाल्यानंतर बोठे पसार झाला होता. त्यामुळे सुरुवातीला अटक केलेल्या पाच आरोपींविरुद्ध पारनेरच्या न्यायालयात पहिले दोषारोपपत्र दाखल केले होते. बोठे याला तब्बल १०२ दिवसांनंतर हैदराबादमधील बिलालनगर परिसरातून अटक केली. या अटकेला येत्या १० जून रोजी ९० दिवस पूर्ण होत आहेत. त्यापूर्वी हे दोषारोपत्र दाखल होणे आवश्यक होते. त्यामुळे पोलिसांची धावपळ सुरू होती.

तपासात मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी पुरावे गोळा केले. यापूर्वीच्या आरोपींकडूनही पुरावे मिळाले. शिवाय आरोपी आणि जरे यांच्या घरीही छापे घालण्यात आले होते. आरोपी बोठे याला मदत करणार्‍या २५ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. एकूण समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे जरे आणि बोठे यांचे सुरुवातीला प्रेमसंबंध होते. पुढे त्यात विविध कारणांमुळे वाद होत गेले. शेवटी हे प्रकरण  उघड होऊन आपली बदनामी होईल, या भीतीने बोठे याने सुपारी देऊन हा खून करवून घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments