आपण जनतेसाठी आहोत ही भावना कायम राहावी : हसन मुश्रीफ

आपण जनतेसाठी आहोत ही भावना कायम राहावी : हसन मुश्रीफ 



वेब टीम नगर : ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाची आठवण चिरंतन राहावी आणि आपल्या सर्वांना प्रशासन चालविताना आपण जनतेसाठी आहोत, ही भावना कायम राहावी यासाठी या शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचे औचित्य आहे. त्यामुळेच लोककल्याणाची भूमिका ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करावे,’ असे प्रतिपादन मुश्रीफ यांनी केले.यावेळी शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली. महाराष्ट्र सरकारने ६ जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा प्रारंभ मुश्रीफ यांच्या हस्ते नगरमधून करण्यात आला

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले पाटील, उपाध्यक्ष प्रतापराव शेळके, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सुनील गडाख, काशीनाथ दाते, उमेश परिहर, मिराताई शेटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद नवले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्यासह विविध पदाधिकारी-अधिकारी उपस्थित होते.

सुरुवातीला मुश्रीफ आणि मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. महाराजा सयाजी गायकवाड यांच्या जिल्हा परिषद आवारातील पुतळ्यासही मान्यवरांनी अभिवादन केले. त्यानंतर मुश्रीफ यांच्या हस्ते भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली. यावेळी सारेच वातावरण जणू शिवमय होऊन गेले होते.

मुश्रीफ म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केल्यानंतर खर्‍या अर्थाने जनतेचे रा्ज्य सुरु झाले. त्यामुळेच आपला केंद्रबिंदू ही सामान्य जनता असावी. लोककल्याणाची भूमिका स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणार्‍या पदाधिकारी, अधिकारी आणि इतर कर्मचार्‍यांमध्ये असावी, यासाठी ग्रामविकास विभागाने हा निर्णय घेतला. आजपासून महाराष्ट्र शिवराज्यभिषेकाची आठवण या शिवस्वराज्य दिनानिमित्त चिरंतन जपेल. जेथे महिलांना वाव देण्याचे, त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम होते, तेथे नक्कीच प्रगती होते,’ असे ते म्हणाले.

हीरकमहोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेने मुलींसाठी जाहीर केलेल्या शिष्यवृत्ती योजना आणि स्वयंसहायता बचत गटाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments