महागाईचे संकट आणखी वाढण्याची भीती
वेब टीम मुंबई : करोना विषाणू साथीच्या तडाख्यात सापडलेल्या चालू आर्थिक वर्षातील देशाचा एकूण विकास दर अंदाज रिझर्व्ह बँकेने कमालीचा खाली आणताना भविष्यात वाढत्या महागाईचे संकट उद्भवणार असल्याची भीती शुक्रवारी व्यक्त केली.
अर्थव्यवस्थेच्या साहाय्यासाठी गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी पतधोरणाच्या माध्यमातून आणखी काही उपाययोजनाही जाहीर केल्या. आदरातिथ्य, नोकरदार अशी काही क्षेत्रे आणि वर्गांना दिलासा देण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या आर्थिक वर्षातील विकास दर उणे (-) ७.३ टक्के नोंदला गेला होता.
रिझर्व्ह बँकेचे दुसरे द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना दास यांनी, २०२१-२२ या चालू वित्त वर्षात भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन ९.५ टक्क्यांपर्यंत असेल, असे अंदाजित केले. यापूर्वी हा अंदाज १०.५ टक्के होता. तर मार्च २०२२ अखेरपर्यंत महागाई ५.१ टक्के राहण्याची शक्यताही वर्तविली.
प्रमुख व्याजदर स्थिर
अपेक्षेप्रमाणे रिझर्व्ह बँकेने तिच्या दुसऱ्या द्वैमासिक पतधोरणात प्रमुख व्याजदर स्थिरच ठेवले. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सलग सहाव्यांदा रेपो दर किमान अशा ४ टक्क्यांवर कायम ठेवत असल्याचे शुक्रवारी जाहीर केले.
नव्या आर्थिक वर्षाची सुरुवातच करोना साथीच्या दुसऱ्या मोठ्या लाटेने झाली. त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील विपरीत परिणाम चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या अर्ध वित्त वर्षात जाणवू लागतील. अर्थव्यवस्थेला उभारी घेण्यास काही कालावधी लागू शकतो. – शक्तिकांत दास, गव्हर्नर, रिझर्व्ह बँक.
0 Comments